- नितिन पंडीत
भिवंडी- भिवंडी ठाणे महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठं मोठ्या खाड्यांमुळे या महामार्गावर रोजची वाहतूक कोंडी होत आहे. ज्याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांसह चाकरमानी व प्रवाशांना होत आहे. महत्वाचे म्हणजे ठाणे कशेळी ते अंजुरफाटा भिवंडी हा रस्ता कल्याण संगम इन्फ्रा या कंपनीस बीओटी तत्वावर शासनाने दिला असून कंपनीकडून टोल वसुली मोठ्या प्रमाणात दिवस रात्र केली जात आहे. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेकडे या टोल कंपनीचे पुरता दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून पूर्णा गाव ते राहनाळ गाव या साधारणतः दोन ते टीम किलोमीटर अंतरावर रस्त्याला भले मोठे खड्डे पडले असून रस्त्याच्या कडेला असलेल्या गटाराचे पाणी भर रस्त्यावर येत असल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.
या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून खराब रस्त्यामुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महत्वाचे म्हणजे या महामार्गावर गोदाम पट्टा मोठ्या संख्येने असल्याने चाकरमान्यांना या मार्गावरून रोजचा प्रवास करावा लागत आहे. त्यातच खराब व खड्डेमय रस्त्यामुळे या मार्गावर रोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. अंजुरफाटा ते काल्हेर या जवळपास आठ ते नऊ किलोमीटर अंतरासाठी तब्बल अडीच ते तीन तास वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा रोजचा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कशेळी येथे आंदोलन केले होते त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कशेळी टोलनाका देखील फोडला होता. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गासह भिवंडीतील वाहतूक कोंडी व रस्त्यांवरील खड्डयांची समस्या सोडविण्यासाठी भिवंडीचा दौरा केला होता.
यावेळी टोल कंपानीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत चांगलेच खडेबोल सुनावले होते, पालकमंत्र्यांनी केलेली कानउघडणी नंतर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत गांभीर्याने विचार व नियोजन करून रस्ता व्यवस्थित करण्यात येईल असे आश्वासन टोल कंपनी बरीबरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पालकमंत्र्यांना देण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही या रस्त्याची परिस्थिती जैसे थे अशीच आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या दौऱ्याचा व स्थानिकांनी केलेल्या आंदोलनांचा टोल कंपणीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणताही फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीला नेमकी मुहूर्त कधी मिळणार याकडे स्थानिकांसह प्रवाशांचे लक्ष लागले आहे.