- नितिन पंडीत
भिवंडी- भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या दुरावस्था झाली आहे . त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असून नुकताच २२ जुलै रोजी वडघर गावातील २० वर्षीय तरुण तेजस अभिमन्यू पाटील याचा या महामार्गावरील खड्डयांमुळे जीव गेला आहे. मात्र या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
सुप्रीम कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा रस्त्याबाबत दुर्लक्षित धोरणामुळे स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र येत सर्वपक्षीय गाव विकास संघर्ष समिती स्थापन केली असून या संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चिंचोटी अंजूरफाटा ते माणकोली या महामार्गावर कामण , खारबाव , कालवार व अंजूरफाटा अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असून रस्त्याच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिक करणार आहेत. त्यासंदर्भातील लेखी निवेदने गाव विकास समितीच्या वतीने विविध शासकीय कार्यालयांना देण्यात आली आहेत .