लोकमत न्यूज नेटवर्क
रोहिदास पाटील
अनगाव : भिवंडी तालुक्यातील नदीनाका ते पारोळ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना, तसेच पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या भिवंडी-वाडा महामार्गावरील नदीनाका येथून सुरू होणाऱ्या रस्त्यावरील तळवली, जुनादुर्खी, लाखीवली, नादा, चिबीपाडा आदी ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सतत वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असल्याने या खड्डयांतून वाट काढताना वाहन चालक हैराण होतात. या खड्डयांत वाहने आदळून अपघाताच्या घटना घडतात. यात अनेक जण जखमी तर काहींचा मृत्यू झालेला आहे. दरवर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केला जातो, मात्र, दुरुस्ती व्यवस्थित होते की नाही, नसेल तर तो निधी जातो कुठे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. याकडे भिवंडी सार्वजनिक विभागाचेही दुर्लक्ष होत आहे, असा आराेपही स्थानिक करत आहेत.
--------
...अन्यथा रास्ता रोकोचा इशारा
या रस्त्याची आठ दिवसांत दुरुस्ती न केल्यास श्रमजीवी संघटना रास्ता रोको आंदोलन करेल, असा इशारा संघटनेचे शहर तालुका अध्यक्ष सागर देसक, उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, तानाजी लहागे, सचिव मोतीराम नामकुडा, संघटक यशवंत भोईर आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
-------
नदीनाका- पारोळ रस्त्यावर खड्डे पडले आहेत, हे खरे आहे. संबंधित ठेकेदाराला खड्डे भरण्यासाठी सूचना दिल्या आहेत. लवकरच काम सुरू होईल.
- अनिल पवार, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भिवंडी.
-----------
दुचाकी पळविली
अनगाव : भिवंडी शहरात वाहनचोरीच्या घटना वाढल्या असतानाच बागेफिर्दोस मशिदीजवळ उभी करून, ठेवलेली मुनाफ पटेल यांची दुचाकी चोरीला गेल्याची घटना शनिवारी घडली आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.