उल्हासनगर : शहरातील दुर्दशा झालेल्या रस्त्याची समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल करून सांगा. असे आवाहन राष्ट्रवादीचे अजित मखिजानी यांनी शहरवासीयांना केले आहे. उल्हासनगरातील बहुतांश रस्त्याची दुरावस्था झाली असून महापालिकेने रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचें काम सुरू केले नाही. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या कामाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तसेच पावसाने उसंत घेऊनही रस्ता दुरुस्तीचे काम महापालिका बांधकाम विभागाने का सुरू केले नाही? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे अजित माखिजानी यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल पाठवीत, शहरातील रस्त्याच्या दुरावस्थे बाबत प्रश्न उपस्थित केला. माझ्या प्रमाणे नागरिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना मेल पाठवून शहरातील रस्ते समस्या बाबत माहिती द्या. असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे असून ते यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे शहरातील समस्याची माहिती मुख्यमंत्री यांना आहे. असे अजित माखिजानी म्हणाले.
शहरातील रस्ते दुरुस्ती, रस्त्यातील खड्डे भरणे, रस्त्याची पुनर्बांधणी या विकास कामात भष्ट्राचार होत असल्याची ओरड सोशल मीडियावर होत आहे. तर दुसरीकडे महापालिका आयुक्त अजीज शेख यांनीं रस्ते विकासासाठी कोट्यवधींचा निधी असल्याचे सांगून रस्ते चकाचक होणार आहेत. असे म्हटले आहेत. सद्यस्थितीत रस्त्याची दुरावस्था होऊन रस्ते धुळीने माखले आहेत. तसेच दरवर्षी रस्त्यावर कोट्यवधींचा खर्च करूनही रस्स्त्याची दुरावस्था का? असा प्रश्न विचारला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रस्ते बाबत नागरिकांनी मेल केल्यास, मुख्यमंत्री शिंदे हे रस्ते विकासासाठी मोठा निधी देऊ शकतात. अशीं आशाही माखिजानी यांनी व्यक्त केली आहेत.