सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात बहुतांश रस्त्याची चाळण झाली असतांना कॅम्प नं-४ व ५ मधील प्रभाग क्रं-१७ मधील रस्ते मात्र चकाचक झाले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भारत गंगोत्री यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून २५ कोटींचा निधी आणून रस्ते व उद्यानाचा विकास केला.
उल्हासनगर प्रभाग क्रं-१७ मधून राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री यांच्यासह ४ नगरसेवक निवडून आले होते. दरम्यान महापालिका आर्थिक अडचणीत असतांना प्रभाग विकास कामासाठी निधी मिळणार नाही. असे गृहीत धरून पक्षाचे गटनेते गंगोत्री यांनी तत्कालीन पक्षाच्या शहराध्यक्षा सोनिया धामी यांच्या मदतीने, प्रभागातील विकास कामा बाबत थेट तत्कालीन अजित पवार यांच्याशी पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्याला यश येऊन उपमुख्यमंत्री पवार यांनी रस्ते, नाल्या व उद्यान विकासासाठी २५ कोटींचा निधी गंगोत्री यांच्या प्रभागासाठी दिला. यामध्ये सिमेंट काँक्रीटची १२ रस्ते, नेताजी उद्यानसह ४ उद्याने व एक फुटपाथ नाल्याचा समावेश आहे.
कॅम्प नं-४ येथील हिंदू स्मशानभूमी परिसरातील रस्ते, पाच दुकान रस्ता, भाटिया चौकातील रस्ता, दहाचाळ, महात्मा फुले कॉलनीतील रस्ते, नेताजी गार्डनसह ४ उद्याने, गणेशनगर मधील फुटपाथ आदी विकास कामे करण्यात येत आहे. १२ पैकी ६ रस्त्याचे काम पूर्ण झाले असून इतर ६ रस्ते प्रगतीपथावर असल्याची माहिती भारत गंगोत्री यांनी दिली. गंगोत्री प्रमाणे इतर पक्षाच्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागासाठी शासनाकडून विकास निधी आणला असतातर, शहरातील रस्ते चकाचक दिसले असते. अशी टीका नागरिकांकडून स्थानिक नगरसेवकांवर होत आहे. दरम्यान पावसाने उघडकीस दिल्यावर रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली. तसेच निधी कमी पडू देणार नसल्याचे आयुक्त म्हणाले.