उल्हासनगर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मध्यवर्ती रुग्णालयातील अंतर्गत गटारांची दुरुस्ती झाली नसल्याने, सांडपाणी उघड्यावर वाहून दुर्गंधी पसरली. या सांडपाण्याच्या दुर्गंधीने रुग्णासह इतरांचे आरोग्य धोक्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचार घेतात. तर बाह्यरुग्ण विभागाची संख्यां ९५० पेक्षा जास्त आहे. रुग्णालयाचे शौचालय, बाथरूम आदींच्या सांडपाणी वाहण्या दुरुस्ती अभावी तुबल्या असून सांडपाणी रुग्णालय परिसरात वाहत असल्याने, सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तुंबलेल्या गटारी व शौचालयाच्या वाहिन्या आदींची दुरुस्ती करण्याची मागणी हाकेच्या अंतरावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचकडे वारंवार केल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बनसोडे यांनी दिली. मात्र विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप डॉ बनसोडे यांनी केला.
रुग्णालयात रुग्णाच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता हवी. मात्र स्वच्छतेला बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हरताळ फासला जात असल्याचे बनसोडे यांचे म्हणणे आहे. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते याबाबत आम्हाला जबाबदार धरतात. मात्र रुग्णालयातील कोणत्याही कामाची दुरुस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे.
मध्यवर्ती रुग्णालयातील शौचालय व बाथरूमच्या वाहिन्यांची दुरुस्ती वेळोवेळी होत नसल्याने, त्या तुंबून रुग्णालयात दुर्गंधी पसरली आहे. तसेच खालील अंतर्गत गटारी ओव्हरफ्लॉ होऊन सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याची माहिती डॉ बनसोडे यांनी दिली. याप्रकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. याबाबत सार्वजनिक कार्यालयात कार्यकारी अभियंता यांच्या सोबत संपर्क साधला असता, झाला नाही. सामाजिक कार्यकर्ते व रुग्णमित्र राजू तेलकर यांनीही रुग्णालयातील दुर्गंधी बाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच या दुर्गंधीने रुग्णा सोबत आलेले नातेवाईक, डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने याबाबत दखल घेऊन दुरुस्ती बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारावा, असेही तेलकर म्हणाले.
रुग्णालयातील दुर्गंधीला सार्वजनीक बांधकाम विभाग कारणीभूत मध्यवर्ती रुग्णालयातील अंतर्गत गटारे व शौचालय वाहिनीची दुरुस्ती वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत नाही. त्यामुळेच सांडपाणी वाहून रुग्णालयात दुर्गंधी पसरल्याचा आरोप रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.