बदलापूर : कुळगाव-बदलापूर पालिकेच्या ४७ प्रभागांचे पॅनल पध्दतीने २३ प्रभाग पाडले आहेत. २२ पॅनल हे दोन प्रभागांचा मिळून बनविण्यात आले असून उर्वरित एक पॅनल तीन प्रभागाचा बनविण्यात आला आहे. या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तर अंबरनाथ पालिकेनेही ५७ प्रभागांसाठी २८ पॅनल निश्चित केले आहे. तो प्रस्तावही पाठविण्यात आला आहे.अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या पालिकेच्या अनुषंगाने प्रभाग रचनेचा अहवाल पाठविण्यात आला आहे. या दोन्ही पालिकांची निवडणूक एप्रिलमध्ये होणार असून सरकारच्या जुन्या आदेशानुसार पॅनल पध्दतीने प्रस्ताव तयार केले आहेत. दोन प्रभाग मिळून एक पॅनल तयार केले आहे. ते तयार करताना प्रभागाच्या क्रमांकानुसार करण्यात आले नसून जनगणनेच्या ब्लॉकनुसार प्रभाग निश्चित करून ते जोडण्यात आले आहेत. त्यामुळे सरळ रांगेतील दोन प्रभाग एकत्रित येतीलच याची निश्चिती राहिलेली नाही.राज्य सरकारने पॅनल पध्दत रद्द करण्याचा निर्णय घेतलेला असतानाही अद्याप त्या आदेशाची प्रत निवडणूक आयोगाला न गेल्याने आणि आयोगाकडून नवीन आदेश न आल्याने अंबरनाथ, बदलापूर पालिकेने जुन्या आदेशानुसारच कामकाज सुरू ठेवले आहे. १७ जानेवारीला प्रभाग पध्दतीनुसार हे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.प्रस्तावाला मंजुरी दिल्यावर ते हरकतींसाठी नागरिकांपुढे येणार आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाला सरकारच्या नव्या आदेशाची प्रत गेल्यावर निवडणूक आयोग नवीन कार्यक्रम जाहीर करणार की जुन्याच पध्दतीने निवडणूक घेणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जिल्हाधिकारी कुठला निर्णय घेतात याकडे आता नागरिक, राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
बदलापूर पालिकेचा २३ प्रभागांचा अहवाल तयार, मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 12:58 AM