बदलापूर : केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी कुळगाव – बदलापूर नगरपालिकेने १ मार्चपासून सुरुवात केली आहे. आतापर्यंत २ हजार ३०५ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.
१ ते ५ मार्चपर्यंत १ हजार ५९५ सरकारी व खासगी आरोग्य कर्मचारी, ३३५ फ्रंटलाईन कर्मचारी (पालिका कर्मचारी, पोलीस, फायर ब्रिगेड व इतर ) ३७५ ज्येष्ठ नागरिक अशा एकूण २ हजार ३०५ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. तर शनिवारी १०० नागरिकांनी टोकन घेतले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या सर्वांना पुन्हा २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागणार आहे.
४५ ते ५९ वयोगटातील वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलेल्या व्यक्तींना ही लस नगरपालिकेच्या दुबे रुग्णालयात मोफत दिली जात असून सेंट्रल हॉस्पिटल, बदलापूर येथेही अशी सुविधा उपलब्ध असून त्यासाठी २५० रुपये शुल्क आकारले जात आहे. केंद्र सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच ४५ वर्षांहून अधिक वयाच्या विविध आजार असलेल्या रुग्णांना आजाराबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून ही लस दिली जात आहे.
-----------------------------------------------
लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी – डॉ. राजेश अंकुश
ही लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी टोकन घेणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी येताना नाश्ता किंवा जेवण करून येणे आवश्यक आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला काही आजार असेल तर त्यांनी मेडिकल हिस्ट्रीची फाईल सोबत आणणे आवश्यक आहे.
माझा नंबर लवकर लागावा म्हणून मी सकाळी लवकर आलो होतो. या ठिकाणी चांगली व्यवस्था आहे. येथील कर्मचारीही चांगले आहेत. लस घेण्यापूर्वी व घेतल्यानंतर काय करावे व काय करू नये हे व्यवस्थित सांगितले जाते. लस घेण्यापूर्वी मनात फार भीती होती, पण लस घेतल्यानंतर काहीही वाटले नाही.
- रामकृष्ण देवपूरकर, ज्येष्ठ नागरिक