लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : सुमारे पंधरा दिवसांपूर्वीच खड्डेमुक्त झालेला बदलापूरच्या उड्डाणपुलाचा रस्ता पुन्हा एकदा खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, या वाहनकोंडीतून वाट काढून शहराच्या पूर्व-पश्चिम भागात जाण्यासाठी वाहनचालकांना अर्धा ते पाऊणतास लागत आहे. ऐन गणेशोत्सवातच रस्त्याची अशी दुरवस्था झाल्याने नागरिक नगर परिषद प्रशासनाच्या कारभाराविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
बदलापूर शहराच्या पूर्व-पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी वाहनचालकांना नगर परिषद कार्यालयाजवळील उड्डाणपूल हा एकमेव पर्याय असल्याने बदलापुरातील वाहतुकीची सगळी भिस्त एकमेव त्यावरच आहे. नवे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुमारे १५ दिवसांपूर्वी या उड्डाणपुलाच्या रस्त्यावरील खड्डे भरले. विशेष म्हणजे त्यांनतर आठ-दहा दिवस हा रस्ता खड्डेमुक्त राहिला. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात गैरसोय होणार नाही, अशी बदलापूरकरांची अपेक्षा होती. परंतु, गणेशोत्सवाच्या आधीच खड्ड्यातील भराव वाहून गेल्याने उड्डाणपुलाच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले. या खड्डेमय रस्त्यावरून चालताना वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रविवारी त्यावर शहराच्या पूर्व-पश्चिम भागात जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ऐन गणेशोत्सवात रस्त्याची खड्ड्यांमुळे अशी दयनीय अवस्था झाल्याबद्दल नागरिक पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. यापूर्वी पावसाळा सुरू झाल्यापासून चार ते पाच वेळा उड्डाणपुलाच्या रस्त्यावरील खड्डे भरले आहेत. नागरिकांनी ओरड केली की पालिका खड्डे भरणार आणि दोन-चार दिवसांतच खड्ड्यातील भराव निघून जाऊन पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरणार, असे नगर परिषदेच्या कामाचे चित्र सातत्याने समोर येत आहे.
----------