बदलापूर : मागील काही महिन्यांपासून सातत्याने रखडत असलेली बदलापूरमधीलअतिक्रमण कारवाई अखेर गुरूवारी पार पडली. यावेळी पूर्व भागातील शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. तर पालिकेच्या कारवाईचा जोर पाहता गाफिल असलेल्या दुकानदारांनी अचानक आपले नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमण काढण्यासाठी धावपळ सुरू केली. पुढील दोन दिवस ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी स्पष्ट केले.
बदलापूरमध्ये गेल्या काही वर्षांत अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांनी डोके वर काढले आहे. बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागात रस्ता रूंदीकरणाचे काम सातत्याने रखडत असल्याने अतिक्रमणे वाढत होती. पूर्व भागातून जाणाऱ्या काटई - कर्जत महामार्गाशेजारीही अशाच प्रकारचे अतिक्रमण वाढले होते. कंपन्यांचे शोरूम, हॉटेल्स, दुकानांचे शेड बेकायदा उभे केले जात होते. तर अनेक बांधकामे थेट अर्धवट रस्त्यापर्यंत येऊन ठेपली होती. यावर कारवाईसाठीही यापूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांनी हात आखडता घेतला होता. मात्र मुख्याधिकारी बोरसे यांनी पूर्वेतील 768 अतिक्रमणांना नोटीस दिली होती. त्यानुसार एकदा रखडलेली कारवाई अखेर गुरूवारी झाली.
पूर्वेतील वेंकीस हॉटेलच्या अतिक्रमणापासून कारवाई सुरू होत पुढे घोरपडे चौकापर्यंत आली. यावेळी कित्येक वर्षे जुन्या अतिक्रमणांवर पहिल्यांदा कारवाई झाली. बोरसे यांच्याबरोबरच नगररचनाकार, शहर अभियंते, इतर विभागाचे अधिकारी, सफाई कामगार आणि कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा या कारवाईसाठी मागवण्यात आला होता. कारवाईदरम्यान होणारे वाद टाळण्यासाठी नागरिकांना दूर ठेवण्यात आले होते. तर महामार्गावरची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचीही फौज तैनात केली होती.
यापूर्वीच्या अनेक अतिक्रमण कारवायांमध्ये घोरपडे चौक ते शिरगाव प्रवेशद्वारापर्यंतच्या अतिक्रमणांपर्यंत कारवाई पोहचली नव्हती. त्यामुळे पालिकेच्या नोटिसीनंतरही दुकानदार निर्धास्त राहत होते.
दुकानदारांनीही केले सहकार्यगुरूवारी सुरू झालेल्या कारवाईचे स्वरूप पाहता सकाळी दहानंतर अचानक सर्वच दुकानदारांनी आपापली अतिक्रमणे काढण्यास सुरूवात केली. अनेक दुकानदारांनी स्वखर्चाने जेसीबी मागवत बांधकाम तोडत होते. ही कारवाई दोन दिवसात पूर्ण करून अतिक्रमणे काढली जातील असे बोरसे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बदलापूर- कर्जत महामार्ग अखेर मोकळा श्वास घेणार आहे.