बदलापूर- गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून जोरदार हजेरी लावली. अंबरनाथ आणि बदलापूर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आता पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कोंडेश्वर धबधबा देखील वाहू लागला आहे. कोंडेश्वरचा परिसर निसर्गरम्य झाला असला तरी यंदा पर्यटकांना या ठिकाणी जाण्यास परवानगी दिली जाते की नाही हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पर्यटनासाठी नेहमीच प्रसिद्ध राहिलेला कोंडेश्वरचा धबधबा पर्यटकांना खुणवू लागला आहे. सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंडेश्वरच्या डोंगर रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे ओढे वाहू लागले आहेत. त्यामुळे कोंडेश्वरचा धबधबा देखील भरून वाहू लागला आहे. या धबधब्याच्या शेजारीच महादेवाचे प्राचीन शिवमंदिर असल्यामुळे या ठिकाणी भाविक दर्शनासोबत पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यंदा देखील अशा प्रकारची बंदी घातली जाते की नाही याची उत्सुकता पर्यटकांना लागून राहिली आहे.