बदलापूर - सोळाव्या बदलापूर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुुरुषांच्या खुल्या गटात सागर म्हसकर याने विजेतेपद मिळवले. तर, महिलांच्या गटात बदलापूरच्या प्रियंका भोपी हिने विजेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेतील ११ गटांत तब्बल सहा हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.१५ आॅगस्टनिमित्ताने बदलापूर शिवसेना शाखेच्या वतीने नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. सलग १६ वर्षे ही स्पर्धा अखंडपणे सुरू आहे. ११ गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. सकाळी १० वाजता या स्पर्धांना प्रारंभ झाला. स्पर्धेचा पारितोषिक समारंभ दुपारी १ वाजता गांधी चौकात झाला. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यंदा स्पर्धेदरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खऱ्या अर्थाने ही वर्षा मॅरेथॉन झाली. शाळेतील विद्यार्थ्यांसह अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.१० वर्षांखालील मुलांच्या गटात गोविंद चव्हाण आणि सचिन राठोड हे दोघे अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय आले. याच गटातील मुलींच्या स्पर्धेत पायल चव्हाण आणि कविता राठोड या अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय आल्या. १२ वर्षांखालील गटात स्वरूप लोकरे आणि पयपल्ली अॅनकीयन यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.मुलींच्या गटात दिया मोरे आणि स्रेहा राठोड यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात अजय जाधव आणि प्रतीक भोपी यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात किशोर मोकाशी आणि भाग्यश्री नागाथेंकरे या मुलींनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.१७ वर्षांखालील मुलांच्या गटात अनिकेत चौधरी आणि व्यंकटेश राठोड यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात रेश्मा राठोड आणि वृतिका सोनावणे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत सूर्यवंशी भोसले आणि कंचेखर अवधूत यांनी अनुक्रमे विजेते आणि उपविजेतेपद मिळवले. या स्पर्धेदरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली.
बदलापूर मॅरेथॉन : सागर, प्रियंका यांची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 2:03 AM