बदलापूर : दहीहंडीसंदर्भात सरकारच्या नियमांना विरोध करण्यासाठी मंगळवारी मनसेच्या वतीने बदलापुरात प्रतीकात्मक दहीहंडी साजरी करून ती फोडण्यात आली. दहीहंडी फोडणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बदलापुरात दहीहंडी होणारच अशी आक्रमक भूमिका मनसेने घेतली होती. त्यानंतर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसही बजावली होती. मात्र त्यानंतरही मनसेने बदलापुरात प्रतीकात्मक दहीहंडी उत्सव साजरा केला. बदलापूरमधील म्हसकर मार्केट, अंबिका हॉटेल परिसरात शहराध्यक्ष जयेश कदम, जिल्हा संघटक उमेश तावडे यांच्या मार्गदर्शनानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी दहीहंडी फोडली. मनसे कार्यकर्त्यांनी निर्बंध झुगारून ही हंडी फोडून मनसेचा झेंडा फडकवला. दहीहंडी असो किंवा हिंदूंच्या सणांवर सरकारने निर्बंध लावले तर आम्ही केस झाली तरी हे सण साजरे करू, अशी तीव्र प्रतिक्रिया मनसे कार्यकर्त्यांनी दिली आहे.