बदलापूर : बदलापूर नगरपालिका प्रशासन ज्या प्रशासकीय इमारतीमधून कामकाज करीत आहे, ती इमारत चक्क दुबे रुग्णालयाची इमारत आहे. दुबे रुग्णालयात अनधिकृतपणे आपला ताबा मिळवून कार्यालय थाटणाऱ्या पालिका प्रशासनाला आता दुबे रुग्णालय चालवण्यात रस राहिलेला नाही. केवळ वैद्यकीय अधिकाराच्या भरवशावर केवळ ओपीडी चालवण्याचे काम पालिका प्रशासन करीत आहे. त्यामुळे बदलापूरच्या आरोग्य व्यवस्थेबाबत पालिका प्रशासन किती उदासीन आहे. याचा प्रत्यय नागरिकांना आला आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर पालिकेला मुबलक जागा नसल्यामुळे दुबे रुग्णालयातील काही भाग ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पालिका प्रशासन आपला कारभार चालवत आहे.
बदलापूर शहर झपाट्याने वाढत असताना आणि पालिकेच्या उत्पन्नात वाढ होत असताना दुबे रुग्णालयाने पालिका प्रशासनावर दाखवलेली मेहरबानी म्हणून तरी किमान दुबे रुग्णालय चालवण्यासाठी आपली इच्छाशक्ती दाखवणे गरजेचे होते. दुबे रुग्णालयातील अर्धी इमारत रुग्णालय म्हणून तर अर्धी इमारत पालिका कार्यालय म्हणून वापरली जात आहे, असे असताना देखील पालिका प्रशासनाला दुबे रुग्णालय सुस्थितीत चालावे यासाठी कोणतीही इच्छाशक्ती दिसत नाही.
आज पालिका प्रशासन स्वतःची भव्य इमारत उभारत असली तरी ज्या इमारती मधून बदलापूर शहराने विकासाची नोंद केली आहे त्या इमारतीमधील दुबे रुग्णालय पुनर्जीवित करण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले आहे. कोरोना काळात पालिका प्रशासनाने सक्षमपणे वैद्यकीय यंत्रणा उभारली होती, मात्र कोरोना संपताच वैद्यकीय व्यवस्था पुन्हा कोमात गेली आहे चौकट: # रुग्णालयात केवल ओपीडी: संपूर्ण दुबे रुग्णालयात केवळ बाह्य रुग्ण विभाग म्हणजेच ओपीडी सुरू ठेवण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही रुग्णावर या ठिकाणी उपचार केले जात नाहीत. रुग्णालय एका डॉक्टरांच्या भरवशावर: शहरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी रुग्णालयात डॉक्टरांचा आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या स्टाफची महत्त्वाची जबाबदारी असते. मात्र या रुग्णालयात केवळ वैद्यकीय अधिकारी हा एकमेव डॉक्टर असल्यामुळे रुग्णालयात कोणतीही सुविधा देता येत नाही.
ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला: दुबे रुग्णालयात ज्या रुग्णाची प्रकृती खालावली आहे अशा रुग्णांना ओपीडी मधून थेट ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. ग्रामीण मधून रुग्ण शहरी भागात उपचारासाठी येत असताना बदलापुरात मात्र शहरी भागातील रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात जावे लागते.