बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या शाळेचा पट यंदा आणखी वाढला आहे. ३३६ विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश घेतले असून, त्यामध्ये २७ विद्यार्थी इंग्रजी व खासगी शाळांमधून आलेले आहेत. नगर परिषद शाळेच्या पटावर कोरोना काळात २०५५ विद्यार्थी असून, येत्या काही महिन्यांत ही शाळा ३००० विद्यार्थ्यांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
कुळगाव-बदलापूर नगर परिषद शाळेतील शिक्षकांनी मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्या आदेशानुसार संपूर्ण शहरात विद्यार्थी संपर्क अभियान राबविले आहे. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाला त्यांच्या शाळानिहाय वर्ग देण्यात आला होता. त्याअंतर्गत शिक्षकांनी आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन संपर्क साधला आहे. चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या या अभियानात शिक्षकांनी किती विद्यार्थी बदलापूर शहरात राहत आहेत, याचे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणादरम्यान काही नवीन विद्यार्थी आढळून आले. तसेच जे गावाला गेले आहेत व पुन्हा येणार आहेत, त्यांच्याशी शिक्षकांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या विद्यार्थ्यांचे दीक्षा ॲपवरून ऑनलाईन शिक्षणही सुरू केले. मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका तसेच पीडीएफमध्ये अभ्यास देण्यात आला आहे. शिक्षकांनी घरोघरी जाऊन नगर परिषद शाळांची वैशिष्ट्ये सांगितली. त्यामुळे पालकांचा व विद्यार्थ्यांचा नगरपरिषद शाळांकडे ओढा वाढला असल्याचे, शिक्षण विभागाचे प्रमुख विलास जडये यांनी सांगितले.
नगर परिषदेच्या १६ शाळांच्या वर्ग खोल्यांची रंगरंगोटी करण्यात आली असून, शाळांच्या २ नव्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. शिक्षकांना वेळोवेळी सर्व शिक्षा अभियान, महाराष्ट्र व केंद्र शासन तसेच नगरपरिषद प्रशासन देत असलेल्या प्रशिक्षणामुळे शिक्षकांची कार्यक्षमता वाढत असून, नवनवीन पद्धती विकसित केल्या जात आहेत.