बदलापूर - पहिल्यांदा शहरातील बंद पथदिवे आणि नंतर गणपूर्ती अभावाचे कारण देत दोनवेळा सभा तहकूब करण्यात आली होती. मात्र विषयपत्रिकेत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातील १० कोटींच्या कामांचा विषय हा सभा तहकुबीला महत्वाचा मुद्दा ठरला होता. अखेर हा ठराव वादळी चर्चेनंतर सर्वसहमतीने मंजूर करण्यात आल्याचे नगराध्यक्षांना जाहीर करावे लागले. शिवसेनेचे शैलेश वडनेरे वगळता शिवसेनेने घूमजाव करत या ठरावाला सहमती दर्शवली. भाजपाने मतदानाची मागणी केली मात्र शिवसेना गटनेते श्रीधर पाटील यांनी ऐनवेळी शिष्टाई केल्याने शिवसेनेला मतदानातील आपला पराभव टाळण्यात यश मिळवता आले.या अनुदानाचे १० कोटी शहरातील क्र ीडासंकुलासाठीच खर्च करण्यात यावेत अशी सत्ताधारी शिवसेनेची भूमिका होती. तर या १० कोटी रूपयातून शहरातील गटार, विद्युत व्यवस्था, उद्यान, उद्यानातील खेळणी लावणे अशी कामे करण्याची भाजपा नगरसेवकांची मागणी होती. हा विषय फेटाळण्यावरून शिवसेनेत मतभेद असल्याचे चित्र दिसले. त्यामुळे नामुष्की टाळण्यासाठी ही सभा लांबवण्यात येत असल्याची चर्चा होती. आधी ३० जुलै आणि नंतर सात आॅगस्ट अशी दोनवेळा पुढे ढकलण्यात आलेली सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. नगराध्यक्षा विजया राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. दहा कोटी रु पयांचा क्र ीडासंकुलाचा निधी शहरातील अन्य विकासकामांसाठी वर्ग करण्याचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडून आला होता.या विषयावर शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील, शैलेश वडनेरे, माजी नगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक जयप्रकाश टाकसाळकर, अरु ण सुरवळ, राष्ट्रवादीचे गटनेते आशिष दामले यांनी हा निधी क्रीडा संकुलासाठीच राखून ठेवावा अशी आक्रमक भूमिका घेतली. या विषयावर पाटील यांनी आमदार किसन कथोरे हे विकासाचे वारे असताना त्यांनी हा निधी जमिनीखालील कामांच्या विषयांसाठी वळवण्यास कशी परवानगी दिली असे सांगून आश्चर्य व्यक्त केले.शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपाचे गटनेते राजेंद्र घोरपडे आक्र मक भूमिका घेत शिवसेनेचे सर्व मुद्दे खोडून काढले. नगराध्यक्षांसह सर्वांना विनंती केली की हा ठराव मंजूर करावा. क्र ीडासंकुलाचा आराखडा मंजूर करून आल्यानंतर पुन्हा सरकारकडून त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ. येत्या दिवाळीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापूरमध्ये येणार आहेत त्यावेळी ते यासाठी निश्चित दहा कोटी नव्हे तर वीस कोटी देतील असे ठामपणे घोरपडे यांनी सांगितले. भाजपाचे शहर अध्यक्ष संभाजी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष शरद तेली, किरण भोईर, संजय भोईर यांनी या ठरावाच्या बाजूने आपली भूमिका मांडली. तरीही वडनेरे आणि दामले यांनी विरोधाची भूमिका घेतली.अखेर घोरपडे यांनी नगराध्यक्षांना या विषयावर मतदान घेण्याची सूचना केली. मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी मतदान घेण्याचे जाहीर केले. त्यावर शिवसेनेचा पराभव स्पष्ट दिसल्याने गटनेते पाटील यांनी ऐनवेळी शिष्टाई केली. पाच मिनिटे सभा तहकूब करून चर्चा करण्याचे सुचवले. अखेर नगराध्यक्षा विजय राऊत यांनी हा ठराव सर्वसहमतीने मंजूर करण्याची घोषणा केली. त्यावर वडनेरे यांनी आपला विरोध नोंदवावा असे सांगितले.या विषयावरील चर्चेच्यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे हे शांत बसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. पालिकेमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत असताना या विषयावर मतदान झाले असते तर शिवसेनेला दारु ण प्रभाव पत्करावा लागला असता, कारण शिवसेनेचे अनेक सदस्य गैरहजर होते. तर भाजपाचे बहुतेक सर्व नगरसेवक उपस्थित होते. विषय मंजूर होताच अनेक सदस्यांनी काढता पाय घेतला.अन्य प्रकल्पासाठी निधी वर्ग का केला नाहीबदलापूर पालिकेच्या नगरसेवकांनी सरकारला पत्र पाठवत वैशिष्टपूर्ण अनुदानाचा निधी आपल्याकडे वळविताना सेना नगरसेवकांना बाजूला सारले.अनुदानाचा निधी पडून राहणार ही भीती भाजपाला होती, तर मग या निधी शहराच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी का वर्ग केला गेला नाही. हा निधी थेट प्रभागातील लहान मोठ्या कामांसाठी का वापरला गेला, याची उत्तरे मिळालेली नाहीत.अनुदान प्रभागात वापरण्यासाठी सरकारने परवानगी दिली असली तरी ती परवानगी ही काही अटींवर दिली आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे सेनेला अडचणीत आणणारे ठरत आहे.
बदलापूर पालिका : दहा कोटींच्या कामांना दिली मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 2:45 AM