बदलापूर शहरातील एका प्रख्यात शाळेमध्ये शिशूवर्गातील ४ वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या लैंगित अत्याचाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी शाळेच्या प्रशासनाने घेतलेली भूमिका आणि पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यात केलेली दिरंगाई यामुळे आज बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. आज सकाळपासून बदलापूरमधील त्या शाळेसमोर पालकांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर आपला मोर्चा वळवला. तसेच मागच्या पाच सहा तासांपासून हे आंदोलक बदलापूर रेल्वे स्टेशनवरील रुळांवर ठाण मांडून आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. दरम्यान, बदलापूर रेल्वे स्टेशनवरील आंदोलन हा ठरवून केलेला राजकीय स्टंट आहे, असा दावा येथील स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी केला आहे.
बदलापूरमधील आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना किसन कथोरे म्हणाले की, सकाळी बदलापूरमधील आंदोलन अशाप्रकारे भरकटलं की शाळा बाजूला राहिली आणि आंदोलक रेल्वे स्थानकात घुसले. आज रेल्वेस्टेनमध्ये घुसलेले जेवढे आंदोलक आहेत. त्यातील बहुतेक हे बदलापूरचे रहिवासी नाहीत. सरळी बाहेरून आलेली मंडळी आहे. खरं म्हणजे शाळेतील वातावरण आता शांत झालं होतं. तिथे कुणी आंदोलक राहिले नव्हते. शाळेतील मुख्याध्यापकांवर कारवाई झाली. कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. संस्थाचालकांची चौकशी सुरू केली. शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीला सुरुवात केली. त्यामुळे आता ही ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी आहे. त्यामुळे आज बदलापूरकरांना वेठीस धरलंय, रेल्वेला वेठीस धरलंय. हे योग्य नाही. सगळ्यांना माझी विनंती आहे की, शांतता राखा, कुणीही या प्रकरणी राजकारण करू नका, असे आवाहन किसन कथोरे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, स्वत: गृहमंत्र्यांनी आदेश दिले होते. नागरिकांनीही संयम पाळला होता. मात्र काल कुणीतरी चिथावणी दिली. बॅनर रात्रीच तयार झाले आणि बदलापूरमध्ये लागले. लाडकी बहीणचा लाभ नको, न्याय द्या म्हणून. हे बॅनर उल्हासनगर आणि जिकडून तिकडून भरून आले. हे ठरवून कुणीतरी केलं आहे, मी सांगू शकतो, असेही कथोरे पुढे म्हणाले.