बदलापूर : अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेने जाणा-या बदलापूर रेल्वेवर गेल्या दोन दिवसांपासून काही अज्ञातांकडून लोखंडी वस्तू फेकून मारल्याच्या घटना समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसांत झालेल्या दोन हल्ल्यात दोन प्रवासी जखमी झाले असून, मंगळवारी रात्री विनय कटारे या प्रवाशाच्या हातावर लागलेल्या लोखंडी वस्तूने त्यांच्या हातावर मोठी जखम झाली. त्यांच्या हाताला पंधरा टाके पडले आहेत. बदलापूर रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून, या विरोधात रेल्वे पोलिसांनी तात्काळ संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.डोंबिवली येथून बदलापूर येथे रेल्वेने प्रवास करणारे विनय कटारे हे मंगळवारी रात्री डोंबिवली रेल्वे स्टेशनहून बदलापूर लोकलमध्ये चढले होते. मात्र बदलापूर स्टेशनजवळ लोकल येत असताना अंधारातून एक लोखंडी वस्तू त्यांच्या हातावर लागली. या हल्ल्यात विनय यांच्या हातावर मोठी जखम झाली. त्यांचा रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ही जखमी एवढी गंभीर होती की त्यांच्या हाताला पंधरा टाके पडले आहेत. तर दोन दिवसांपूर्वी बदलापूर रेल्वे स्टेशनजवळ ही ट्रेन आली असता, अंधारातून भिरकवलेली लोखंडी वस्तू एका प्रवाशावर भिरकवली होती.या हल्ल्यात त्या प्रवाशाच्या हाताच्या बोटातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत बदलापूर रेल्वे स्टेशनवर येणा-या लोकलमधील प्रवाशांवर लोखंडी वस्तू फेकून मारल्याच्या दोन घटनांमध्ये दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटना वाढत असताना रेल्वे पोलीस मात्र रुळांच्या बाजूला असलेल्या भागात पेट्रोलिंग करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. तर याबाबत रेल्वे पोलिसात आपण तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता, कल्याण येथे जाऊन तक्रार करण्यास सांगितल्याचे विनय यांनी सांगितले. त्यामुळे या घटनांवर योग्य वेळीच नियंत्रण आणत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.
बदलापूर रेल्वे प्रवाशांवर लोखंडी वस्तूने हल्ला, प्रवासी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 11:19 PM