बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात आज यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. बदलापूरमध्ये आज १०.२ अंश इतकं तापमान नोंदवण्यात आले. हवामान तज्ज्ञ अभिजीत मोडक यांनी त्यांच्या स्वयंचलित हवामान केंद्रात या नीचांकी तापमानाची नोंद केली.
गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात गारठा वाढला होता. तापमानाचा पारा हा ११ ते १३ अंशांच्या दरम्यान होता. यापूर्वी २० नोव्हेंबर रोजी बदलापूर शहरात ११.२ अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. मात्र आज बदलापुरात पारा आणखी घसरला आणि १०.२ अंश तापमानाची नोंद झाली. बदलापूरमधील हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी त्यांच्या खासगी स्वयंचलित हवामान केंद्रात ही नोंद केली.
बदलापूर शहर हे समुद्रापासून दूर असल्यामुळे हवेतली आर्द्रता ही हिवाळ्यात कमी होते. उत्तरेकडून येणारे थंड वारे बदलापूर शहरात आधी पोहोचतात आणि ते मुंबईच्या दिशेने वाहत जातात. त्यामुळे बदलापूर शहरात कमी तापमानाची नोंद होऊन पुढे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यामार्गे मुंबईत हे तापमान वाढत जाते. त्यामुळेच उल्हासनगरमध्ये १२.४, कल्याणमध्ये १२.८, डोंबिवलीत १३.४, ठाण्यामध्ये १५.४ तर मुंबईत आज १६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.