लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : शाळेतील मुलींवरील अत्याचाराची दखल राज्य सरकारने घेतली आहे. आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने त्याच शाळेतील इतर मुलींवर अत्याचाराची घटना घडली आहे का, याचा शोध सुरू केला आहे. त्या अनुषंगाने पालकांना मेसेजही पाठविण्यात आले आहेत.
अत्याचार प्रकरणानंतर तपास यंत्रणा सज्ज झाली आहे. शाळेतील आणखी काही मुलींच्या बाबतीत असे प्रकार झाले असल्यास पालकांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन एसआयटीने केले आहे.
अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या एकंदरीत कृत्यावरून शाळेतील अन्य मुलींच्या बाबतीततही असाच प्रकार घडल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अनेक पालक भीतीपोटी समोर येत नसल्याचाही तपास यंत्रणेला संशय आहे. त्यामुळे शिशुवर्गात शिकणाऱ्या मुलींच्या पालकांना मोबाइल संदेश पाठविण्यात आले आहेत.
...अन्यथा हा गुन्हा दडपला असता गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिस संथपणे चौकशी करीत होते. संगीता चेंदवणकर यांच्या मदतीला मग इतर महिला कार्यकर्त्याही पुढे सरसावल्या होत्या. त्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्या तरी त्यांनी आपला पक्ष बाजूला ठेवला आणि घडलेल्या प्रकाराविरोधात बदलापूरकरांना संघटित केले होते. प्रियांका दामले यांनीही या प्रकरणात प्रशासनाला धारेवर धरले होते. संगीत चेंदवणकर आणि प्रियांका दामले यांच्यामुळेच बदलापूरकर रस्त्यावर उतरले. ते उतरले नसते तर हा गुन्हा दडपला गेला असता, असे म्हटले जाते.