बदलापूर : बदलापूर-काटईनाका-शीळफाटामार्गे मुंबईला जोडणाऱ्या मेट्रोला मंजुरी मिळालेली असली, तरी अजूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. या कामासंदर्भात एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत बदलापूर-काटईनाका-शीळफाटा मेट्रोच्या जागेची मागणी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच १० दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही या बैठकीत राजीव यांनी दिले आहेत.
बदलापूर-काटईनाका-शीळफाटा या मेट्रोमार्गाबाबत पाठपुरावा करणारे आमदार किसन कथोरे यांनी या मेट्रोबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकीची मागणी आयुक्त राजीव यांच्याकडे केली होती. बुधवारी यासंदर्भात राजीव यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत बदलापूर-काटईनाका-शीळफाटा मेट्रोबाबत चर्चा झाली. या चर्चेत बदलापूर-काटईनाका-शीळफाटा मेट्रो ही कांजूरमार्गे येथून पुढे मुंबईला जोडली जाणार आहे. त्यामुळे बदलापूर ते डोंबिवली भागातील नागरिकांना थेट पश्चिमेला जोडले गेल्यास रेल्वेवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या मेट्रोचे काम जलदगतीने व्हावे, अशी मागणी कथोरे यांनी केली. तसेच या मेट्रोसाठी आवश्यक असलेल्या कारशेडची जागाही बदलापूरजवळ देण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याणपर्यंत येणारी मेट्रो आणि शीळफाट्यापर्यंतची मेट्रो ही कारशेडसाठी बदलापूरमध्ये येणार आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम मुंबईला थेट जोडणारी मेट्रो बदलापुरातून जाणार आहे.
यासंदर्भात राजीव यांनीही कामाचे नियोजन पूर्ण केल्याचे स्पष्ट केले. तसेच प्रत्यक्ष जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा प्रस्ताव आल्यावर त्यासंदर्भातील योग्य त्या मंजुरी घेऊन त्या कामाची निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. प्रत्यक्षात हे काम सुरू होण्यास १० ते १२ महिने लागणार आहे. बदलापूर ते शीळफाटा या राज्य महामार्गाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत आहे. त्यामुळे या भागात मेट्रोची सुविधा दिल्यास या परिसरातील नागरिक मुंबईसोबत जोडले जाणार आहे. दुसरीकडे या मेट्रोसाठी आवश्यक असलेल्या कारशेडच्या जागेचाही प्रश्न नसल्याने ते काम जलदगतीने होण्यास अडचण राहणार नाही. या बैठकीला भाजप गटनेते राजेंद्र घोरपडे, संभाजी शिंदे आदी उपस्थित होते.बदलापूर-काटईनाका-शीळफाटा हा राज्य महामार्ग याआधीच चौपदरी करण्यात आला आहे. मात्र, या मार्गावरील वाहतूकव्यवस्थेवर ताण पडत असल्याने याच रस्त्यावरून मेट्रोचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यामुळे जागा ताब्यात घेण्यासाठी कोणत्याही यंत्रणेला काम करावे लागणार नाही. जागा ताब्यात असल्याने कामालाही विलंब होणार नाही. - किसन कथोरे, आमदार