भातसानगर/ खर्डी : शहापूर तालुक्यात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह संध्याकाळी येणाºया तुरळक पावसामुळे भातसानगरजवळील शेंडेगावातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील कौले, पत्रे उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसासोबत आलेल्या वादळाने शहापूर तालुक्यातील शेंडेगाव आणि वाघवाडी येथील अनेक घरांची छपरे, कौले उडाली असून घराच्या भिंतीही पडल्या आहेत. वादळामुळे ज्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांची पाहणी आ. पांडुरंग बरोरा यांनी करून तहसीलदार रवींद्र बावीस्कर आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जाधव यांना पंचनामा करण्याच्या आणि नुकसानभरपाईच्या सूचना दिल्या आहेत.
शेंडेगाव येथील २५ आदिवासी कुटुंबांच्या घरांचे नुकसान झाले असून त्यांनी साठवून ठेवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच विद्युतपोलदेखील पडल्याने विद्युतप्रवाह खंडित झाला आहे. यामुळे या गावाला अंधारात राहावे लागणार आहे. कसारा, शिरोळ, अजनूप आणि भातसानगर परिसरात अनेक घरांचे, पोल्ट्री फॉर्म तसेच विद्युतखांबांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील ज्याज्या गावांतील घरांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करून त्यांच्या नुकसानभरपाईचे अहवाल शासनाला पाठवण्यात येतील.- रवींद्र बावीस्कर,तहसीलदार, शहापूर