बदलापूर शहरात लागू करण्यात आलेला कडकडीत लॉकडाऊन अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. शनिवारी लागू झालेला लॉकडाउन सोमवारी रद्द करून राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे शहरात आता लॉक डाऊन राहणार आहे. मंगळवारपासून व्यापारी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आपल्या नियमित व्यवसाय करु शकणार आहेत.
बदलापूर शहरातील कोरणा रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी बदलापूर पालिकेने तडकाफडकी निर्णय घेत शनिवारी लॉकडाऊन जाहीर केला होता. त्या लॉकडाऊनला जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मंजुरी दिली होती. मेडिकल स्टोअर आणि रुग्णालय वगळता सर्व आस्थापने बंद करण्यासंदर्भात या आदेशात नमूद केले होते. या लॉक डाऊन नंतर शिवसेना आणि भाजपा मध्ये चांगली जुंपली होती. शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी या लॉकडाउनला विरोध दर्शविला होता.
लॉकडाउन करण्याआधी पूर्वतयारी करणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करीत म्हात्रे यांनी हा लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना निर्देशित करून या लॉकडाउन संदर्भात पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश काढत कडकडीत लॉकडाउन रद्द केला आहे. त्यामुळे आता बदलापूर शहरात सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत.
भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी लॉकडाउन लावावा अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी लॉक डाऊन लावला होता. मात्र शिवसेनेने या लॉक विरोध करीत थेट पालकमंत्र्यांना साकडे घातल्याने पालकमंत्र्यांनी आता मध्यस्थीची भूमिका बजावत जिल्हाधिकार्यांना लॉक डाऊन रद्द करण्याबाबत निर्देशीत केले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून हे लॉकडाउन रद्द केले आहे.