बदलापूर : स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्याचा दावा करणारे बदलापूर पालिका प्रशासन प्रत्यक्षात मात्र स्वच्छतागृह उभारणीबाबत उदासीन आहे. अनेक वर्षापासून शहरातील वर्दळीच्या भागात सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महिलांना स्वच्छतागृहाची सोय नसल्याने रेल्वे स्थानक गाठण्याची वेळ येते. पालिका प्रशासनाने ही गैरसोय दूर करण्यासाठी कोणतीच व्यवस्था केलेली नाही. बदलापूर रेल्वे स्थानकापासून पूर्वेकडे कात्रप, शिरगाव, गांधी चौक, खरवई या भागात तर पश्चिमेकडे बेलवली,रमेशवाडी, बदलापूर गाव, हेंद्रेपाडा या भागात मोठी वर्दळ असते. या रस्त्यांवर ठराविक अंतरावर स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. परंतु शहरातील या मुख्य रस्त्यांवर एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. त्यामुळे रस्त्याने जाताना काही वेळा पुरु ष उघडयावरच हे विधी उरकतात परंतु महिलांना मात्र थेट घर गाठण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. या समस्येकडे राष्ट्रवादी काँँग्रेसचे शहर अध्यक्ष कालिदास देशमुख यांनी लक्ष वेधले आहे. वर्दळीच्या रस्त्यांवर स्वच्छतागृहाअभावी महिलांची होत असलेली ही गैरसोय लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांलगत स्वच्छतागृहाची तातडीने उभारणी करणे आवश्यक आहे. नागरिकांकडून अनेक वर्षापासून मागणी होऊनही पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
स्वच्छतागृह नसल्याने बदलापूरकरांची कोंडी
By admin | Published: March 23, 2016 2:08 AM