बदलापूर : बदलापुरात भेडसावणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांची संयुक्त बैठक आयोजित करून बारवीतून पाच एमएलडी पाणी मंजूर करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.
बदलापूरमध्ये जलसंपदा विभागाकडून ३० एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी आहे. परंतु, मजीप्राकडे ट्रीटमेंट प्लान्ट नसल्यामुळे पाणी उचलले जात नाही. मजीप्राने ज्या कंत्राटदाराला हे काम दिले आहे ते कोविडमुळे संथ गतीने सुरू असल्याने ते मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असे समजते .तोपर्यंत पाण्याचा प्रश्न जटिल होईल. याबाबत बारवी डॅममधून पाच एमएलडी पाणी मिळण्यासाठी मजीप्राने एमआयडीसीला प्रस्ताव सादर केला असून तो प्रलंबित आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर ट्रीटमेंट प्लान्ट पूर्ण होईपर्यंत बदलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न सुटेल, म्हणून एमआयडीसी व मजीप्रा यांची संयुक्त बैठक बोलवण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.