बदलापूर : देशातील नामांकित आयआयटी संस्थांपैकी एक असलेल्या कानपूर येथील आयआयटीमध्ये शिकणारा बदलापूरचा अक्षय कांबळे हा विद्यार्थी कानपूरमधून बेपत्ता झाला आहे. आपल्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्याचा त्याच्या पालकांचा प्रयत्न सुरू आहे. तर, या प्रकरणात पोलिसांनीदेखील योग्य तपास करावा, यासाठी त्याचे पालक कानपूरमध्ये तळ ठोकून बसले आहेत. मात्र, स्थानिक पोलिसांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने पालकदेखील हतबल आहेत. अक्षय बेपत्ता होऊन 20 दिवस उलटले, तरी त्याचा शोध लागत नसल्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत.
बदलापूर पूर्वेतील अष्टविनायक सोसायटीत राहणारे भीमराव कांबळे यांचा मोठा मुलगा अक्षय (20) हा अभ्यासात अत्यंत हुशार आहे. त्याला कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत प्रवेश मिळाला. सध्या तो तृतीय वर्षात आहे. परीक्षेनंतर तो महिनाभराच्या सुटीवर येण्यासाठी निघाला. मात्र, 29 नोव्हेंबरला घरी यायला निघालेला अक्षय महाराष्ट्रात दाखल झालाच नाही. मुलाच्या शोधासाठी वडिलांनी मित्रांसह कल्याण, मुंबई येथे तक्रारी देण्यास सुरुवात केली. मात्र, त्यास काही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, त्यांनी कानपूरचे आयआयटी गाठले. संस्थेच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात विद्यार्थी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
मात्र, तपास पुढे सरकला नव्हता. त्याच काळात वडिलांच्या तपासाच्या मागणीच्या रेट्यानंतर अक्षयच्या मोबाइलचे स्थान शोधण्यात आले. दोन सफाई कामगारांकडे अक्षयची दोन सीमकार्डं सापडली, तर एक स्मार्टफोन एका मित्राकडून मिळवला गेला. मात्र, त्यांच्याकडे अधिक चौकशी न करता, त्यांना तत्काळ सोडल्याचा आरोप भीमराव कांबळे यांनी केला आहे.
- सफाई कामगारांकडे अक्षयचे एटीएमकार्ड आणि ओळखपत्र सापडते कसे, हे संशयास्पद असून नेहमी पाकिटात कार्ड ठेवणारा अक्षय महत्त्वाचे कार्ड बाहेर कसे टाकू शकतो, असा सवाल त्याच्या वडिलांनी उपस्थित केला आहे.
- त्याचे सीमकार्डही दुस-या हॉस्टेलच्या सफाई कामगारांकडे मिळाले आहेत. हेही संशयास्पद आहे.
- अक्षयला त्याच्या हॉस्टेलमधील काही सहकारी त्रास देत असल्याची तक्रार त्याने केली होती. त्याची माहिती देऊनही तसा तपास होत नसल्याने अक्षयच्या वडिलांनी उत्तर प्रदेश पोलीस आणि आयआयटी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
मी गेल्या १५ दिवसांपासून कानपूर येथे असून मला येथे कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाही. येथील पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, मात्र तपासात प्रगती नाही. येथील विधानभवनात जाण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मात्र, माझ्या मुलाबाबत चौकशी करण्याऐवजी अनेक संशयास्पद बाबी समोर आणत बदनामी केली जाते आहे. मला माझा मुलगा परत हवा आहे. यात दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी माझी विनंती आहे. - भीमराव कांबळे