ठाणे : पनवेल येथे मुलीकडे बारशासाठी गेलेल्या वासिंद येथील वैशाली आणि विनोद महाजन या दाम्पत्याची बॅग मंगळवारी सकाळी ठाण्यात उतरताना घाईगडबडीत लोकलमध्येच राहिली. ती बॅग ठाणे, दिवा रेल्वे स्थानक प्रबंधक कार्यालय आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेने लगेच मिळाली. बॅगेत १३ तोळे दागिन्यांसह सुमारे ४ लाख रुपयांचा ऐवज होता.महाजन दाम्पत्य पनवेलला जाण्यासाठी आसनगाव-ठाणे लोकलने ठाणे स्थानकात सकाळी १० उतरले. त्यानंतर ती लोकल ठाण्याहून
कल्याणकडे रवाना झाली. महाजन दाम्पत्य पुलावर गेल्यावर दागिने असलेली बॅग लोकलमध्ये राहिल्याचे त्यांच्या लक्षात येतात. त्यांनी लगेच ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात धाव घेतली. बॅग लोकलमध्ये राहिल्याचे त्यांनी उपप्रबंधक आर. के. दिवाकर यांना सांगितले. दिवाकर यांनी लोकलची चौकशी केली असता, ती दिव्याकडे जात असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी दिवा रेल्वे प्रबंधक संत लालसिंग यांना तर काटेवाला प्रवीण कळसगोड यांनी ठाणे लोहमार्ग पोलिसांना याबाबत माहिती दिली. सहायक उपनिरीक्षक रोहिदास आसोळे, पोलीस शिपाई रावसाहेब पाटील, अनिलकुमार जाधव, हरीभाऊ रूपनाथ, ज्योती शिंदे यांनी दिव्यात लोकल येताच तपासणी केली असता बॅग मिळाली. ती महाजन दाम्पत्यास परत दिल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या (गुन्हे) पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी दिली.