ठाणे - बहुजन महापार्टी लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात शिट्टी या चिन्हावर उमेदवार उभे करणार आहे. पालघर लोकसभा मतदार संघात बहुजन विकास आघाडीशी असलेली आघाडी संपुष्टात आली असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत बहुजन महापार्टीचे राष्ट्रीय महासचिव शमशुद्दीन खान यांनी दिली.
बहुजन महापार्टी हा पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तसलीमुन्नीसा खान या आहेत. बहुजन महापार्टी ही महाराष्ट्रात बहुजन विकास आघाडी बरोबर निवडणुकीत स्थानिक पातळीवर आजवर आघाडी करत आलेली आहे. महाराष्ट्रातील पक्षाच्या कोर कमिटीने लोकसभा निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मी चर्चा केली. त्यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन बहुजन विकास आघाडी बरोबर पालघर लोकसभा मतदासंघात स्थानिक पातळीवर आघाडी जाहीर केली होती. मात्र राष्ट्रीय कोअर कमिटीला स्थानिक पातळीवर आघाडी मान्य नसल्याने राष्ट्रीय अध्यक्ष तसलीमुन्नीसा खान यांनी मला 29 मार्च रोजी कारणेदाखवा नोटीस बजावली होती, अशी माहिती बहुजन महापार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान यांनी दिली.
30 डिसेंबर 2018 रोजीच्या दिल्ली येथे झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत स्थानिक किंवा राज्य पातळीवर कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली होती. पक्षाध्यक्षा तसलीमुन्नीसा खान यांच्या आदेशान्वये कारणे दाखवा नोटीसीला उत्तर देताना मी पालघर लोकसभा मतदारसंघासाठी स्थानिक पातळीवर बहुजन विकास आघाडीशी केलेली आघाडी तोडत असल्याची माहिती शमशुद्दीन खान यांनी दिली.
बहुजन महापार्टीचे शिट्टी हे अधिकृत चिन्ह आहे. भारतीय निवडणूक आयोगाने 21 डिसेंबर 2018 रोजी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 29 पक्षांसाठी अधिकृत चिन्ह असल्याचे जाहीर केले आहे. यात बहुजन महापार्टीला 543 लोकसभा मतदारसंघासाठी शिट्टी ही निशाणी दिली आहे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार असून आमचा विजय निश्चित आहे अशी माहिती माहिती बहुजन महापार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान यांनी यावेळी दिली.