कासा : डहाणूतील गडचिंचले साधू हत्याप्रकरणी सोमवारी तपासयंत्रणेकडून ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल न झाल्याने डहाणू प्रथम वर्ग न्यायालयाने २८ आरोपींचा जामीन मंजूर केला आहे.डहाणू प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एम.व्ही. जावळे यांनी हे आदेश दिल्याची माहिती अॅड. अमृत अधिकारी यांनी दिली. या सर्व २८ जणांना खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दाखल दोन गुन्ह्यात अटक झाली होती. दरम्यान, घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना अडथळा आणणे, दंगा करणे आणि खून करण्याच्या प्रयत्नाकरिता ४७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या तिसºया गुन्ह्यातील आरोपपत्रात जामीन दिलेल्या १८ जणांच्या नावांचा समावेश असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ एप्रिल रोजी रात्री चोर समजून जमावाने केलेल्या हल्ल्यात कल्पवृक्ष गिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि त्यांचा चालक नीलेश तेलगडे (३०) यांची हत्या झाली होती. या तिहेरी हत्याप्रकरणी १५४ आरोपी अटकेत आहेत. त्यापैकी १२६ जणांविरुद्ध दोन गुन्ह्यात दोषारोप दाखल झाले, तर २८ जणांविरुद्ध दोषारोप दाखल न झाल्याने जामीन मंजूर झाला, मात्र तिसºया गुन्ह्यात यापैकी १८ जामीन मंजूर झालेल्या आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.
गडचिंचले साधूहत्याप्रकरणी २८ आरोपींचा जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 9:24 AM