मीरा रोड : यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि मीरा भाईंदर महापालिकेचा निलंबित नगररचनाकार दिलीप घेवारे याला गुरुवारी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याआधी सहआरोपी सत्यवान धनेगावे याला मात्र जामीन नाकारण्यात आला आहे.
मीरा भाईंदरमधील यूएलसी घोटाळ्यातील मुख्य फरार आरोपी दिलीप घेवारे याला २५ जून रोजी गुजरातच्या सुरत येथून ठाणे पोलिसांनी अटक केली होती. ठाणे न्यायालयाने सुरुवातीला २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर घेवारेच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ५ जुलैपर्यंत वाढ केली. पोलीस कोठडीत जेमतेम ४ - ५ दिवस काढले नाही, तोच छातीत दुखू लागल्याचे सांगत घेवारे हा ठाण्यातील तारांकित रुग्णालयात दाखल झाला. गेल्या २० पेक्षा जास्त दिवस घेवारे हा तारांकित रुग्णालयात असल्याने आधीच पोलीस व सरकारी यंत्रणेवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच गुरुवारी न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी घेवारेचा जामीन मंजूर केला आहे. वास्तविक अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी काकाणी यांच्या न्यायालयात असताना त्यास तक्रारदार राजू शाह यांनी आक्षेप घेतला होता व तशा तक्रारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व ठाणे सत्र न्यायाधीश यांच्याकडे केल्या होत्या.
दुसरीकडे सहआरोपी सत्यवान धनेगावे याचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयातील न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणकर यांनी १६ जुलै रोजी नामंजूर केला होता. त्यामुळे धनेगावेसह लिमये, कांबळे अद्याप जेलमध्ये आहेत. रहिवास क्षेत्र असताना तो हरितपट्टा दाखवून बनावट यूएलसी प्रमाणपत्र देण्यात आली. आतापर्यंत ५ जमिनींच्या प्रकरणात शासनाचे १०२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आणखी १२ जमिनींच्या प्रकरणांत तपास सुरू आहे.