मीरा राेड : मीरा-भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून परिवहन ठेकेदाराची सातत्याने पाठराखण सुरू असतानाच, सोमवारी परिवहन समितीत सत्ताधारी भाजपने ठेकेदारास गेल्या दीड महिन्यांतील अतिरिक्त फरकाची रक्कम म्हणून तब्बल ५२ लाख ७२ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन ठेकेदारावर भाजपने सुरू ठेवलेली पालिकेच्या पैशांची खैरात प्रशासनाने बंद करण्याची मागणी शिवसेना व काँग्रेसने केली आहे.२०१९ पासून परिवहन सेवेचा ठेका मे. भागीरथी एमबीएमटी या ठेकेदार कंपनीस देण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे, सदर ठेकेदारास महापालिकेने बस व आधुनिक बस डेपो फुकट दिला आहे. बसच्या तिकिटाचे आणि जाहिरातीचे उत्पन्नही ठेकेदारच घेणार आहे. पहिल्या वर्षासाठी ठेकेदारास प्रति किमी मागे २६ रुपये याप्रमाणे पालिका पैसे देत आहे.कोरोना संसर्गानंतर बससेवा सुरू करण्यास परवानगी मिळताच, महापालिकेने सेवा सुरू करण्यास सांगूनही ठेकेदाराने बससेवा सुरू केली नव्हती. त्याने अतिरिक्त पैशांची आणि पुरवणी करारनामा करण्याची मागणी केली. ठेकेदाराची मागणी सत्ताधारी भाजपाने उचलून धरली. परिवहन समितीमध्ये सत्ताधारी भाजपने पुरवणी करारनामा करण्यासह कोरोना संसर्गापूर्वीचे उत्पन्न आणि आताचे उत्पन्न विचारात घेऊन दोहोंतील फरक ठेकेदारास द्यावा, असा ठराव केला.कोरोना संसर्गाआधीचे सरासरी तिकीट उत्पन्न ४२ रुपये प्रति किमी इतके ठरविले होते. त्या अनुषंगाने ठेकेदाराने दिलेल्या बिलानुसार, १६ ते ३१ ऑक्टोबर या १५ दिवसांचे १४ लाख ३७ हजार ९९६ आणि १ ते ३० नोव्हेंबरचे ३८ लाख ३४ हजार असे मिळून तब्बल ५२ लाख ७२ हजार रुपये पालिकेने ठेकेदारास फरकाची रक्कम म्हणून अतिरिक्त दिले आहेत. याशिवाय मूळ करारनाम्यानुसार या दीड महिन्याचे प्रति किमीप्रमाणे १ कोटी ९ लाख ९५ हजार रुपयेही ठेकेदारास देण्यात आले आहेत.
नागरिकांचा केला विचार - मंगेश पाटीलबसमध्ये ५० टक्केच प्रवासी घ्यायचे असल्याने ठेकेदाराने सध्याच्या परिस्थितीत मंजूर दराने बस चालविणे परवडणारे नसल्याचे म्हटले होते. नागरिकांसाठी बससेवा सुरू राहावी, याचा विचार करून फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला, असे परिवहन समितीचे सभापती मंगेश पाटील यांनी सांगितले.सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत म्हणाले की, सत्ताधारी भाजप पालिकेची लूट करून परिवहन ठेकेदाराचे खिसे भरत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. तर, सत्ताधारी भाजपने परिवहन ठेकेदाराची तुंबडी जनतेच्या पैशातून भरली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केली आहे.