सदानंद नाईक, उल्हासनगर : अरिहंत कॅपिटल कस्टमर केअर व एफ-८ विनटोन स्टॉक पुलिंग या व्हाट्सअप ग्रुपच्या अडमीनने ब्रोकर असल्याचे भासवून दिपक दुलानी यांची ३९ लाखाची फसवणूक केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात श्रिया एकेला, मिलिन वासुदेव व रोनल बिलाला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, ओटी सेक्शन परिसरात दिपक शोभराज दुलानी हे कुटुंबासह राहत असून ते व्यवसायाने व्यापारी आहेत. अरिहंत कॅपिटल कस्टमर पुलिंग या व्हाट्सअप ग्रुपचे श्रिया एकेला व मिलिन वासुदेव तसेच एफ-८ विनटन स्टॉक पुलिंग व्हाट्सअप ग्रुपचे अडमीन रोनक बिलाला या तिघांच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये दीपक शोभराज दुलानी हे सदस्य आहेत. २३ डिसेंबर २०२३ ते १३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान या ग्रुपच्या श्रिया अकेला, मिलिन वासुदेव व रोनक बिलाला यांनी दुलानी यांना ब्रोकर असल्याचे भासवून जादा पैसे मिळण्याचे आमिष दाखवून शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतविण्याचे आमिष दाखविले. तब्बल ३९ लाख ५ हजार रुपयांची आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
शहरातील व्यापारी दीपक दुलानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेला फसवणुकीचा प्रकार पोलिसांना कथन केला. अखेर पोलिसांनी व्हाट्सअप ग्रुप अडमीन श्रिया अकेला, मिलिंद वासुदेव व रोनक बिलाला यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.