- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
रिक्षा स्टँड असो की मॉल, तलावपाळीवरील ग्रुप असो मामलेदार मिसळीवर ताव मारणारे खवय्ये असो सध्या जिकडे तिकडे पिळदार मिशांमधील बाजीराव दृष्टीस पडतात. मिशांना ताव भरणारे हे तरुण पाहिले की, सत्तरीच्या दशकातील शिवसेनेच्या स्थापनेच्यावेळी ठाण्यात दिसणारी आकडेबाज मिशांतील शिवसैनिकांची पिढी जुन्या ठाणेकरांना आठवते.कुठलीही फॅशन मार्केटमध्ये आले की ती स्वीकारायला ठाणेकर उत्सुक असतात. ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटानंतर ठाणेकरांमध्ये पिळदार मिशांची क्रेझ इतकी वाढली आहे की, ठिकठिकाणी मिशीला ताव देणारे तरुण दिसत आहेत. ठाणे आणि शिवसेना हे खूप जुने नाते आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर शिवसैनिकांच्या पहिल्या पिढीत पिळदार मिशा आणि दाढी राखण्याची फॅशन लोकप्रिय होती. त्यामुळे अनेक जुन्याजाणत्यांना त्याची आठवण होते. मिशी राखायला काहींना आवडते तर काहींना नाही. परंतु सध्या पिळदार मिश्या ठेवण्याकडे ठाणेकरांचा कल वाढत आहेत. रणबीर सिंगच्या मिश्यांची फॅशन फॉलो करायला तरुणांनी सुरूवात केली आहे. किमान ४० टक्के पुरूषांमध्ये मिशांची फॅशन फॉलो करण्याकडे कल असल्याचे हेअर स्टायलिस्ट सांगतात. मार्केट, मॉल किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर १० पुरूषांपैकी सात जणांनी तरी या पिळदार मिशा ठेवल्याचे दिसते. महाविद्यालयीन विद्यार्थी, कॉर्पोरेटमधील तरुण, व्यावसायिक अशा अनेकांनी पिळदार मिशांसोबत बारीक दाढी ठेवली तर ते अधिक मॅनली वाटतं, असा सल्ला हेअर स्टायलिस्ट रुशील मोरे यांनी दिला. एका दिवशी दहा ग्राहक आले तर किमान सात जण तरी पिळदार मिश्यांसाठीच येतात. अनेक तरुणांना मिशांना पिळ देण्याच्या सवयीकरिता घरी ओरडा मिळतो पण तरीही मिश्यांचा तोरा न्यारा असल्याने ते तो सहन करतात, असेही रुशील म्हणाला. ही फॅशन मुळात मला खूप भावली. पिळदार मिशा काढून टाकाव्या म्हणून घरातून रोज ओरडा मिळत आहे. या मिशा दिसायला जरी चांगल्या असल्या तरी त्या पिळदार स्वरुपात रहाव्या याकरिता देखभाल खूप करावी लागते. त्या काळ््या रहाव्या म्हणून मी रोज मिशांना तेल लावतो. - विशाल खारपुडे, ठाणेपिळदार मिशीमुळे व्यक्तीमत्व खुलते. आॅफीस, पार्टी किंवा कुठेही ही स्टाईल स्वीकारली जाते. मात्र आकडी मिशीसोबत जशी बारीक दाढी असणे महत्त्वाचे तसे हेअरकटही वेगळा असणे आवश्यक आहे. या तीन गोष्टी जुळून आल्या की तुमचे व्यक्तिमत्त्व आमूलाग्र बदलते. - रुशील मोरे, हेअर स्टायलिस्ट