मीरारोड - भाईंदर पुर्वेच्या आझाद नगर जवळील आरक्षण क्र. १२२ मधील बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालन साठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी २५ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असल्याची माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसे आदेश मुख्य सचीवांना दिल्याचे सांगत या मुळे कलादालनाचे काम लवकरात लवकर सुरु होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.भाईंदर पुर्वेच्या खेळाचे मैदान व सामाजिक वनीकरण च्या आरक्षणा पैकी खेळाच्या मैदानातील १५ टक्के भागात बाळासाहेब ठाकरे कलादालन बांधण्याची मागणी सरनाईकांसह शिवसेनेने सतत चालवली होती. महासभेच्या मंजुरी नंतर २०१८ मध्ये राज्य शासनाने देखील मैदानाच्या १५ टक्के क्षेत्र इतके बांधकाम करण्यास बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन ला मान्यता दिली होती. त्याची निवीदा प्रक्रिया झाली. खासदार राजन विचारे यांनी २५ लाखाचा खासदार निधी तर सरनाईकांनी २५ लाखांचा आमदार निधी दिला.
स्थानिक शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी प्रत्येकी साडे बारा लाख प्रमाणे ५० लाख निधी देण्याची तयारी दर्शवली. परंतु तत्कालिन भाजपा आमदार नरेंद्र मेहता व सत्ताधारी भाजपाने मात्र स्थायी समिती मध्ये बाळासाहेबांच्या सांस्कृतिक भवनच्या कामाची निवीदा सातत्याने ना मंजुर केली. जेणे करुन गेल्या वर्षी संतप्त शिवसेना नगरसेवक - पदाधिकारी यांनी स्थायी समिती सभाहगृहा सह महापौर, आयुक्त दालनात तोडफोड केली होती. या तोडफोडी नंतर नरेंद्र मेहता व तत्कालिन महापौर डिंपल मेहता यांनी शिवसेनेसह उध्दव ठाकरे यांचे संस्कार काढत सेनेवर टिकेची झोड उठवली होती.बाळासाहेब ठाकरे कलादालन सुसज्ज व भव्य दिव्य असावे यासाठी राज्य सरकारने या कामासाठी २५ कोटींचा निधी द्यावा अशी मागणी आ. सरनाईकांनी चालवली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन समिती सभागृहात ठाणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली असता त्यावेळी आ. सरनाईक यांनी मीरा भार्इंदर मधील या नियोजित कलादालनाला सरकार कडुन २५ कोटींचा निधी देण्याचा मुद्दा मांडला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मागणीला पाठींबा दिला. त्यावेळी कलादालनाच्या कामाला राज्य सरकार कडुन २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची कार्यवाही करावी , अशा सूचनाराज्याच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांनी केल्याचे आ. सरनाईकां कडुन सांगण्यात आले. पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे उपस्थित होते.मीरा भाईंदर कलावंतांचे माहेरघर व्हावे - सरनाईक
मीरा भाईंदर शहरातील कलाकार , कलाप्रेमी यांच्यासाठी हि हक्काची व कायमस्वरूपी प्रेरणा देणारी वास्तू ठरेल. या कलादालनात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र , जुनी पुस्तके असलेले भव्य ग्रंथालय , लहान मुलासाठी विविध उपक्र म राबविण्याची जागा , विज्ञानाची आवड असलेल्या मुलांसाठी विशेष कक्ष , संग्रहालय , ई लायब्ररी तसेच आपल्या कलेचे प्रदर्शन भरविण्यासाठी या कलादालनात जागा , मूर्तिकलेसाठी विशेष दालन अशा अनेक सुविधा असणार आहेत.
जुनी गाणी तसेच जुन्या साहित्यिक , राजकीय नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी विशेष कक्ष असणार आहे. या कलादालनात विविध सांस्कृतिक , साहित्यिक असे उपक्र म मीरा भाईंदर मधील नागरिकांना राबवता येतील. परिसंवाद , चर्चासत्र , कविसंमेलन असे कार्यक्र म करता येतील. कलावंतांचे माहेरघर म्हणून मीरा भाईंदर शहराची ओळख बनावी हा आपला मानस आहे व त्यासाठी हे कलादालन होणे खूप गरजेचे आहे. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीच्या धर्तीवर प्रदर्शनासाठी जागा तर नेहरू तारांगणच्या धर्तीवर विज्ञान प्रदर्शनाची सोय या कलादालनात असणार आहे असे आ. सरनाईक यांनी सांगीतले.