- स्रेहा पावसकरठाणे : बालनाट्यासाठी दिलेली थीम, त्यानंतर नाट्यसंस्थांकडे सादरीकरणासाठी मागितलेले सेन्सॉरचे प्रमाणपत्र, त्यामुळे नाट्यसंस्थांचा मिळालेला कमी प्रतिसाद, या सगळ्या कारणांस्तव ठाणे महानगरपालिका आयोजित बालनाट्य महोत्सव चांगलाच चर्चेचा विषय ठरला. शनिवारी गडकरी रंगायतन येथे हा महोत्सव पार पडला असला तरी उद्घाटनप्रसंगी खुद्द महापौरांनीही यंदा प्रतिसाद दरवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे म्हटले.महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने बालनाट्य महोत्सव आयोजिला जातो. यंदाही त्याची तयारी डिसेंबर महिन्यात सुरू झाली. यंदा या महोत्सवासाठी महापालिकेने स्वच्छता ही थीम जाहीर केली. मात्र, त्याची माहिती नाट्यसंस्था, कलाकारांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचली नाही. त्यातच महापालिकेने महोत्सवात सहभागी होणाºया संस्थांना अर्जासोबत सेन्सॉरचे प्रमाणपत्र देण्याचे बंधन ठेवले.३० मिनिटांच्या बालनाट्यांसाठी प्रमाणपत्र देणे अनेक संस्थांना शक्य झाले नाही. सुरुवातीला अर्ज घेऊन गेलेल्या ज्या संस्थांकडे सेन्सॉरचे प्रमाणपत्र नव्हते, त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यातच स्वच्छतेची थीम माहीत नसल्याने अनेकांनी भाग घेतला नाही. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत प्रतिसाद कमी मिळत असल्याचे लक्षात आल्यावर महापालिकेने स्वच्छतावगळता इतर विषयांवर आलेल्या नाटकांनाही सहभागी करून घेतले.महापालिकेला जर विषयाचे बंधन ठेवायचे नव्हते, तर इतर संस्थांचे अर्जही आधीच स्वीकारायला हवे होते, अशी बालकलाकार आणि नाट्यरसिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच दोन दिवसांचा महोत्सव एका दिवसात उरकल्याचीही चर्चा रंगायतनमध्ये रंगली होती. शहरातील बच्चे कंपनीसाठी आयोजिलेल्या या बालनाट्य महोत्सवाला केवळ १००-१५० प्रेक्षकच रंगायतनमध्ये उपस्थित होते. बालनाट्याचा या उपेक्षेबाबत रंगकर्मींनी तीव्र नापसंती व्यक्त केली.या महोत्सवात कोणतीही स्पर्धा नसून केवळ मनोरंजन म्हणून विद्यार्थ्यांनी आपापली बालनाट्ये सादर केली. मात्र, तरीही महापालिकेने लावलेल्या बॅनरवर महापौर चषक असा उल्लेख केलेला आढळला. जर स्पर्धा नसेल तर चषक कोणाला देणार, अशीही चर्चाही सकाळी रंगायतन येथे उपस्थितांमध्ये रंगली होती.यंदा थीम दिल्यामुळे बालनाट्य महोत्सवाला प्रतिसाद कमी मिळाला. स्वच्छतेच्या थीमला आणखी काही तरी पर्यायी थीम द्यावी, असे मी सुचवले होते.- मीनाक्षी शिंदे, महापौरसेन्सॉरचे प्रमाणपत्र तर दरवर्षी प्रत्येक नाट्यसंस्थेकडून घेतले जाते. यंदा शहरात स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे आणि तत्सम विविध उपक्रम सुरू असल्याने या बालनाट्य महोत्सवासाठीही स्वच्छता ही थीम ठेवली होती. त्यामुळे संस्थांना नाटके सादर करता आली नाही.परंतु, कमी नाटकांमुळे एकाच दिवसात महोत्सव उरकावा लागला. तर, काही नाटके ही थीमवर आधारित नव्हती, मात्र त्यात लहान मुलांचे नाटक असल्याने सहभागी करून घेतले. पुढील वर्षी थीम ठेवू नये.- मीनल पालांडे, क्रीडा अधिकारी, ठाणे पालिका
बालनाट्य महोत्सव एक दिवसात उरकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 7:48 AM