बदलापूर : अतिवृष्टीमुळे यंदा भातपिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने हतबल झालेल्या बळीराजाला यंदा तुरीने मोठा आधार दिला आहे. अंबरनाथ तालुक्यात यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड करण्यात आली असून यंदा चांगले उत्पादन येण्याची शक्यता आहे. सत्तर टक्क्यांहून अधिक भातपीक अतिवृष्टीमुळे वाया गेले असले तरी शेताच्या बांधावर लावलेल्या तूर लागवडीतून त्याची भरपाई होण्याची चिन्हे आहेत.खरीप हंगामात भाताबरोबरच यंदा अतिरिक्त पीक म्हणून मोठ्या प्रमाणात तूर लागवड करण्यात आली. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना ४ हजार १३७ किलो तुरीचे बियाणे विनामूल्य देण्यात आले. ठाणे जिल्ह्यात ३ हजार ३०९ हेक्टर क्षेत्रात त्याची लागवड करण्यात आली. तुरीचे पीक हाती यायला सहा महिने लागतात. लवकरच तुरीची कापणी होणार असून शेतकऱ्यांच्या हाती चांगले पीक येणार आहे. साधारणपणे हेक्टरी ४०० किलो तूर मिळते. यंदा अंबरनाथ तालुक्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड झाल्याने तुरीच्या उत्पादनाचा विक्रम होण्याची शक्यता आहे.मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात यंदा शेताच्या बांधावर तुरीची लागवड करण्यात आली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रोत्साहन म्हणून ही योजना राबविण्यात आली. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घ्यावे, याकरिता गावागावात जाऊन शेतीशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले होते. पिंपळोली वाडीतील प्रगतशील शेतकरी बारकुभाऊ उघडे यांनी यंदा त्यांच्या शेताच्या बांधावर तूर लागवड केली आहे. तुरीला खेकड्यांपासून होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा विशिष्ट अंतरावर, शेताच्या बांधावर प्लॅस्टिकच्या पिशवी ठेवून त्यात रोप लागवड करण्यात आली होती. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तूर लागवड केल्याने रोपे जगली आणि त्यांची चांगली वाढ झाली, म्हणून यंदा तुरीचे पीक चांगले आल्याचे बारकुभाऊ उघडे यांनी सांगितले.पिकाची निगा राखण्याबाबत प्रशिक्षण बीडीएन ७११ या जातीचे तुरीचे बियाणे शासनाने शेतकऱ्यांना विनामूल्य शेताच्या बांधावर उपलब्ध करून दिले. इतकेच नव्हे तर तूर लागवड करण्यापासून कापणीपर्यंत सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले. पिकाची निगा कशी राखायची, याचेही प्रशिक्षण दिले. विशेष म्हणजे तालुक्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन होणार असल्याचा विश्वास कृषी अधिकारी सचिन तोरवे यांनी व्यक्त केला.
बळीराजाला यंदा तुरीचा आधार; चांगल्या उत्पादनाची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:45 PM