जव्हार : जून महिना संपत आला तरी पाऊस पाहिजे तसा पडलेला नाही. दडी मारलेल्या पावसामुळे सुरुवातीला लागवड केलेले पीक मरते की काय, अशा चिंतेत बळीराजा सापडला आहे.
जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके ९९ टक्के आदिवासीबहुल आहेत. येथील आदिवासींचा मुख्य रोजगार म्हणजे शेती, त्यामुळे सर्व खेडोपाड्यात आदिवासी बांधव शेती करतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात काही दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे भात, नागली, तुरी, वरी, उडीद, भुईमूग, हळद यासारखी महागडी बि-बियाणे घेऊन लागवड केली. त्यानंतर त्याला लागणारे महागडे खतही विकत घेऊन शेतात टाकले आहे. परंतु पावसाने अचानक दडी मारल्यामुळे आणि येत्या काही दिवसांत पाऊस पडेल याचीही शाश्वती नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. येथील गरीब आदिवासी जनतेने जीवाचा आटापिटा करीत नांगरणी केली, पेरण्या केल्या, रोजंदारीवर मजूर बोलावले, मात्र गेल्या २२ ते २५ दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे काही संघटनांनी भरपाई मिळण्याकरिता मागणी करणार असल्याचे सांगितले.
पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा हा मागासलेला व डोंगराळ भाग आहे. येथील मजुरांना दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतर व्हावे लागते. येथील शेती ही कोरडवाहू असून फक्त पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे.