सदानंद नाईक/ उल्हासनगर : टेंडर घोटाळ्यावरून भाजप व शिवसेना आमने-सामने आले असून टेंडरवॉरचा चेंडू महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या कोर्टात गेला. मात्र दोषी ठेकेदारावर कारवाई होण्यापूर्वी त्यांच्यात समझोता होणार का? असा प्रश्न राजकीय नेत्यांसह नागरिकांना पडला आहे.
उल्हासनगर भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, आमदार कुमार आयलानी यांनी पत्रकार परिषद घेऊन बोगस कागदपत्राद्वारे कोट्यवधीं किंमतीचे विकास कामाचे ठेके घेतले जात असल्याचा आरोप केला. याला शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान मदत करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
भाजपच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी अशान यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्यावर आरोप करून त्यांच्या मुलांच्या कंपनीला महापालिकेने काळ्या यादीत टाकल्याचे सांगितले. तर दुसऱ्या एका प्रकरणाची चौकशी असल्याचे सांगितले. त्यानंतर मंगळवारी भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांची भेट घेवून पी अँड झा कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासाठी साकडे घातले. तसेच २२ माजी नगरसेवकांनी पत्र दिले आहे.
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी टेंडरवारच्या तक्रारीवरून शहर अभियंता यांना चौकशीचे आदेश दिले. आयुक्तांच्या आदेशाने संबंधीत ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. आयुक्तांच्या चौकशी आदेशाने अनेक जणांच्या बोगस कागदपत्र व विकास कामाच्या दर्जाचे बिंग फुटेल. या भीती पोटी महापालिका ठेकेदाराची बैठक रात्री उशिरा झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. टेंडर आरोप-प्रत्यारोप व तक्रारी मागे घेऊन हमी साथ साथ चले. असे चित्र राजकीय नेते, ठेकेदार व पालिका अधिकारी घेणार असल्याचेही बोलले जात आहे. भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप मुळे हे बांधकाम मंत्री यांचे कट्टर समर्थक आहेत. तर अरुण अशान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व जवळचे संबंध आहेत.
महापालिका विकास कामे वादात? शहरातील दोन सत्ताधारी पक्षनेते टेंडर घोटाळ्याच्या आरोपावरून आमने-सामने आल्याने, महापालिका कारभार व विकास कामे वादात सापडले आहे. शहरातील विकास कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्हे उभे राहूनही राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. त्याला या टेंडरवारमुळे दुजोरा मिळाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.