ठाणे, शहापूर : बिबट्य़ाच्या तोंडातून स्वत:सह बहिणीची सुटका करणारी शौर्य पुरस्कार विजेती हाली बरफ चार महिन्यांपासून हलाखीचे जीवन जगत आहे. शहापूर तालुक्यातील रातांधळे येथे पती आणि तीन मुलांसोबत राहत असून चार महिन्यांपासून तिला रेशनवरील धान्यही मिळालेले नाही. लाकडे फोडून कसाबसा उदरनिर्वाह करत आहे.
तानसाच्या अभयारण्यात स्वत:सह बहिणीला बिबट्याच्या तावडीतून सोडवणाऱ्या हाली बरफला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानीत केले आहे. स्वयंपाकासाठी सरपण आणण्यासाठी बहिणीसह ती जंगलात गेली होती. झुडपात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने तिच्या बहिणीला उचलून नेण्याचा प्रयत्न केला होता. पण क्षणाचाही विलंब न लावता हालीने दगडांचा मारा करून बिबट्याच्या तावडीतून बहिणीची सुटका करत जीव वाचवला होता. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने २०१३ मध्ये तिला बालशौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ती हाली राम कुवर या नावाने ओळखली जात आहे.
तिला रेशनिंगकार्ड मिळालेले नव्हतेे तेव्हा ‘लोकमत’सह श्रमजीवी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते प्रकाश खोडका यांनी तिची प्रशासनाकडे कैफियत मांडली होती. याबाबत पाठपुरावा करून तिला अंत्योदय कार्ड प्राप्त करुन दिले. पण गेल्या चार महिन्यांपासून त्यावर अन्नधान्यही मिळालेले नसल्याचे वास्तव खोडका यांनी प्रशासनाकडे मांडले आहे. एवढेच नव्हे तर शहापूर येथील आदिवासी विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात रोजंदारीने काम करणाऱ्या हालीचा रोजगारही गेलेला आहे. कोरोनामुळे आश्रमशाळा शाळा, वसतिगृहच बंद असल्यामुळे तिच्या रोजगारावर गदा आली आहे. गावातही फारसा कामधंदा नाही. लाकडे फोडणाऱ्या पतीला ती आपल्यापरीने मदत करीत आहे. जंगलातून लाकडांची मोळी आणून ती गावात देऊन त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यावर सध्या ती तीन मुलांसह पतीचा उदरनिर्वाह करीत आहे. वेळप्रसंगी या परिवारास अर्धपोटी राहण्याचा प्रसंग ओढावलेला असल्याचे खोडका यांनी ‘लोकमत’ला सांगितले.