ठाणे : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये १५ मार्च ते १३ मे २०२३ या कालावधीत संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घातल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपायुक्त परोपकारी यांनी काढलेल्या मनाई आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सायंकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत टँकरच्या माध्यमातून धोकादायक रसायनाची वाहतूक करुन ते नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन नदीतील जैवविविधतेवरही परिणाम होतो. त्यामुळे १५ मार्च ते १३ मे २०२३ या काळात डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घातली आहे.