ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने गणेशोत्सवाची नियमावली तयार केली आहे. त्या अनुषंगाने पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्याघरीच कसे करता येऊ शकते, याचा व्हिडीओ पालिकेने तयार केला आहे. कोणते घटक टाकून पीओपीचे विघटन होऊ शकते, याची माहिती त्यात देण्यात आली आहे. विसर्जनासाठी केवळ तीन व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. गणेशमंडपात तसेच परिसरात सेल्फी घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन घाटावर गर्दी टाळण्यासाठी आरती घरीच करण्याच्या सूचनाही प्रशासनाने केल्या असून आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत मास्क तसेच फेसशिल्ड वापरणे बंधनकारक केले आहे.कोरोनामुळे यंदा गणेशोत्सवावर विरजण पडले आहे. गणेशोत्सव काळात गर्दी झाली, तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये गणेशमूर्तीच्या उंचीपासून ते सार्वजनिक मंडळांनी कोणते नियम पाळावेत, याबाबत सूचना केल्या आहेत. मंडपात तसेच परिसरात अनेकजण सेल्फी काढण्यासाठी एकत्र येतात. ही गर्दी टाळण्यासाठी पालिकेने मंडपात आणि परिसरात सेल्फी घेण्यास बंदी घातली आहे.गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनावेळी जास्तीतजास्त तीनच लोक असावेत, अशाही सूचना केल्याआहेत. शहरातील घरगुती आणि सार्वजनिक मंडळांचा आकडा मोठा आहे. एका मूर्तीमागे तीन व्यक्ती आल्या तरी विसर्जन घाटांवर आरतीमुळे नागरिकांची मोठी गर्दी होऊ शकते. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने आरती घरीच करून केवळ मूर्ती विसर्जनासाठी आणण्याच्या सूचना केल्या आहेत. गणेशोत्सव मंडळांनी दिवसातून तीन वेळा मंडप निर्जंतुकीकरण करावे, असेही सांगण्यात आले आहे.भक्तांनी शक्यतोवर शाडूमातीच्या मूर्ती बसवाव्यात, असे आवाहनही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसे शक्य नसल्यास पीओपीच्या मूर्ती विसर्जन करण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करावा, जेणेकरून मूर्ती ४८ ते ७२ तासांच्या आत विरघळून जाईल. हे कसे करावे, याचा व्हिडीओ पालिकेने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.>मूर्ती स्वीकृतीकेंद्रे - संख्या २0मासुंदा तलाव परिसर, मढवी हाउस, जेल तलाव, चिरंजीवी हॉस्पिटल, मॉडेला चेकनाका, देवदयानगर, कोपरी प्रभाग कार्यालय, पवारनगर जंक्शन, खेवरा सर्कल, घाणेकर आॅडिटोरिअम, किसननगर बसस्टॉप, शिवाजीनगर, यशोधननगर चौक, लोकमान्यनगर बसस्टॉप, रोड नं. २२, ट्रॉपिकल लगून, आनंदनगर, लोढा लक्झोरिया, मनीषानगर, भारत गिअर्स, शीळ प्रभाग कार्यालय, जिव्हाळा हॉल दिवा.>विसर्जन घाट सातठिकाणी : कोपरी, कळवा पूल (ठाणे बाजू), कळवा पूल निसर्ग उद्यान, बाळकुम घाट, पारसिक रेतीबंदर, कोलशेत, दिवा.>कृत्रिम तलावमासुंदा तलाव, खारेगाव, रेवाळे, पायलादेवी मंदिर, उपवन, नीलकंठ हाइट, रायलादेवी तलाव नं.१, तलाव नं.२, घोसाळे तलाव, खिडकाळी, कोलशेत विभाग, ब्रह्मांड, दातिवली, न्यू शिवाजीनगर येथील १३ ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे.