ठाणे : वाहनांची सुरक्षा उपाययोजना अधिक काटेकोरपणे करण्यासाठी ‘एचएसआरपी’ (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स) अत्यंत उपयुक्त आहे. या नव्या प्रणालीमुळे वाहनचोरीच्या घटनांमध्ये बऱ्याच प्रमाणात घट होईल. यामुळे एचएसआरपी नवीन वाहनास लावलेली नसल्यास त्या वाहनांना १ एप्रिलपासून रस्त्यावर उतरवण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, ‘एचएसआरपी’शिवाय नवीन वाहने ताब्यात घेऊ नये व रस्त्यावर वापरू नये, असे मार्गदर्शनदेखील कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत वाहन वितरकांना बैठकीत केले आहे.
वाहनांच्या अधिक सुरक्षा व नोंदणीसाठी एचएसआरपी नवीन उत्पादित वाहनांना बसवण्याच्या प्रक्रियेस सोमवार, १ एप्रिलपासून सुरु वात होत आहे. या प्लेट्स उत्पादक व वितरकांमार्फत बसवल्या जाणार आहे. या प्लेटमुळे वाहनांच्या सुरक्षा उपाययोजना अधिक काटेकोर करणे शक्य आहे. केंद्र शासनाने ४ व ६ डिसेंबर २०१८ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार १ एप्रिलपासून नवीन उत्पादित होणाऱ्या वाहनांना वाहन उत्पादक, वाहनाच्या वितरकामार्फत ‘एचएसआरपी’ बसवण्यात येतील. त्यामुळे नवीन वाहनास एचएसआरपी बसवल्याची खातरजमा करूनच नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात येईल, असेदेखील सासणे यांनी या बैठकीत स्पष्ट केले.‘एचएसआरपी’ ही टेम्पर प्रूफ स्वरूपातील असून स्नॅप लॉकद्वारे एकदा वाहनावर लावल्यानंतर त्याचा उपयोग कोणत्याही अन्य वाहनांवर करता येणार नाही. ही प्लेट कोणत्याही नैसर्गिक कारणाने पुसट किंवा खराब झाल्यास वाहननोंदणी तारखेपासून पुढील १५ वर्षांपर्यंत वितरकाकडून ती विनामूल्य बदलून दिली जाणार आहे. या ‘एचएसआरपी’वर पेटंटेड क्रोमिअम बेस होलोग्राम हा अशोकचक्र आकारात हॉट स्टॅम्प पद्धतीने चिकटवला जाणार आहे.वाहन क्रमांकावर ‘रेट्रो रिफलेक्टिंग’ प्लेट ही हॉट स्टॅम्प व एम्बॉसिंग पद्धतीने राहणार असून, त्यावर व्हेरिफिकेशनसाठी ‘आयएनडी’ हा शब्द ४५ डिग्रीच्या कोनावर प्रत्येक अक्षर व अंकावर छपाई केला जाणार आहे.प्रत्येक ‘एचएसआरपी’वर किमान नऊ अंकी परमनंट आयडेंटिफिकेशन क्रमांक हा लेझर इम्बॉसमेंट पद्धतीने त्यावर वाहन निर्माता, टेस्टिंग एजन्सी व वाहन वितरकाची माहिती कोड स्वरूपात छापली जाणार आहे.स्टिकर वाहनाच्या विंड स्क्रिन काचेवर चिकटवणे आवश्यकचारचाकी वाहनास पुढच्या व मागच्या ‘एचएसआरपी’सह एक तिसरे रजिस्ट्रेशन मार्क स्टिकर त्यावर सदर वाहनाच्या पुढील व मागील प्लेटचे कोड तसेच वाहनाचा क्रमांक सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह स्टिकर स्वरूपात प्राप्त होणार आहे, जो वाहनाच्या पुढील विंड स्क्रिन काचेवर डाव्या बाजूला खाली चिकटवायचा आहे.वाहन उत्पादक हे ‘एचएसआरपी’ उत्पादकामार्फत नंबर प्लेटचा पुरवठा त्यांच्या स्थानिक प्रतिनिधीमार्फत वितरकाकडे करतील. वाहन वितरक हे मोटार वाहन विभागाकडून प्राप्त झालेले वाहन नोंदणी क्रमांक हा ‘एचएसआरपी’ उत्पादकाच्या प्रतिनिधीला कळवतील.‘एचएसआरपी’चा प्रतिनिधी नोंदणी क्रमांकाची पंजी तयार करून वितरकाकडे सादर करतील.वाहन वितरक हे ‘एचएसआरपी’ वाहनास बसवतील. ‘एचएसआरपी’चा सिरीअल क्र मांक हा वितरक वाहन प्रणालीला नोंद करतील, त्यानंतर वाहनांचे आरसी प्रमाणपत्र जारी करतील. या प्रणालीमुळे वाहनचोरीच्या घटनांमध्ये बºयाच प्रमाणात घट होईल.