- प्रज्ञा म्हात्रेठाणे : कोरोनाचे सावट जवळपास दूर झाले असून, लग्नाचा धडाका सुरू झाला आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे खर्चात जवळपास ३० टक्के वाढ झाली आहे. महागाई असली तरी लग्नसराई जोरात आहे; परंतु, लग्नाची खरेदी करताना हात आखडतादेखील घेतला जात असल्याचे सध्या चित्र आहे.
कोरोनामुळे लग्नसराईवर मोठे संकट आले होते. अनेकांनी लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या होत्या, तर काहींनी ठरलेल्या तारखेला विवाह सोहळे रद्द केले होते. कोरोनामुळे उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा आल्याने काहींनी घरगुती पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला; तर बहुतांश जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.
कोरोनाचे सावट आले की, नियमांत बदल केले जात; यामुळे मंगल कार्यालयाचे मालकदेखील त्रस्त झाले होते. ३१ मार्चनंतर राज्य शासनाने कोरोनाचे निर्बंध हटविले असल्याने लग्नसराई धुमधडाक्यात सुरू आहे. परंतु, दुसरीकडे महागाईचा चटकाही सोसावा लागत आहे. मंगल कार्यालयापासून जेवणाचे ताट, बँड बाजा तसेच, सोने चांदी, कपड्यांच्या खरेदीवर महागाईचे संकट आहे.
कमीत कमी पदार्थांचे ताट घेण्यावर भर
ताटांचे दर २५ टक्क्यांनी वाढले आहे. जसा मेन्यू निवडाल तसे ताटांचे दर वाढत जातात. वाढत्या दरांमुळे ताटातील जिन्नस निवडताना सर्वसामान्य हात आखडता घेत आहेत, हेही तितकेच खरे. कमीत कमी पदार्थांचे ताट घेण्यावर सध्या भर आहे. महागाईची झळ सर्वांनाच बसली आहे. - नरेंद्र प्रसादे, कॅटरर व्यावसायिक
साेने ५४ हजार ताेळा
सोने ५४ हजार तोळ्यावर गेलेले आहे; त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाला ते खरेदी करणे परवडत नाही; परंतु, दुसरीकडे सोन्याचे दर वाढतील म्हणून भीती असल्याने त्याची खरेदी सुरू आहे. जिथे दोन तोळे सोने खरेदी केले जात होते, तिथे मात्र एक तोळा खरेदी केले जात आहे. रशिया-युक्रेनच्या लढाईनंतर या सोन्याच्या दरांत वाढ झाली आहे. त्यामुळे फक्त लग्नसराई आहे म्हणून सोने खरेदी सुरू आहे. सध्या गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे पाठ फिरविली आहे. - तेजस सावंत, सोन्या-चांदीचे व्यापारी