ठाणे : मालमत्ता कर आणि पाणी बिलाची थकबाकी असलेल्या ३५०० घरांपुढे वसुलीसाठी बँडबाजा वाजावण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. यामुळे आता बँडबाजा लग्नाच्या वरातीबरोबरच घराघरांसमोर वाजणार आहे. उल्हासनगर पालिकेने गतवर्षी थकबाकीदारांच्या घरासमोर बँडबाजा वाजवल्याने तेथील वसुली दुप्पट झाली होती. आता उल्हासनगरातील ही कल्पना ठाण्यातील प्रशासनाने आयात केली आहे. बँड वाजवूनही थकबाकी वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण झाले नाही तर थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या मिळकतीवर कडक कारवाई कराण्याचे आदेशही जयस्वाल यांनी दिले आहेत.मालमत्ता आणि पाणी बिलाच्या वसुलीसाठी शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत जयस्वाल यांनी मालमत्ता कर व पाणी बिल थकीत आहेत, अशा इमारतींचा पाणीपुरवठा खंडीत करण्याची व थकबाकी न भरताच पुन्हा पुरवठा जोडल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.दरम्यान, जे मालमत्ताधारक मालमत्ता कर आणि पाणी बिल भरत नसतील त्यांच्या मलनि:सारण वाहिन्या महापालिकेच्या मुख्य मलनि:सारण वाहिन्यांपासून खंडीत करणे, वीज पुरवठा खंडीत करण्याबाबत महावितरण कंपनीस पत्र देणे, मोठ्या थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रात आणि शहरात होर्डिंग्जवर प्रसिध्द करणे, अनिवासी मालमत्ता जप्त करणे, असे आदेशही महापलिका आयुक्तांनी दिले.
थकबाकीदारांच्या घरासमोर वाजणार बॅण्डबाजा
By admin | Published: January 25, 2016 1:20 AM