ठाणे : उल्हासनगर येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबाबत केलेल्या आक्षेर्पाह विधानानंतर सोमवारी ठाण्यातील कोपरी भागातील सिंधी समाजाने मार्केट बंदची हाक दिली होती. शांततेच्या मार्गाने हाताला काळ्या फिती लावून सिंधी बांधवांनी हा बंद पाळला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, एसआयटीची नियुक्ती करुन आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याची फोरेन्सीक अथवा सायबर तज्ञाद्वारे आॅडीओ व व्हिडीओ क्लीपची तपासणी करुन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.
मागील महिन्यात उल्हासनगर भागात एका कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना आव्हाड यांनी हे आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आव्हाड यांचा हा व्हिडीओ मॉर्फ करण्यात आल्याचा दावा राष्टÑवादीने केला आहे. परंतु तो कुठेही मॉर्फ केला गेल्याचे दिसत नसल्याचे सिंधी बांधवांची भावना आहे. त्यानुसार सोमवारी कोपरीत ठाणे रहिवासी सिंधी समाजाच्या वतीने कोपरीतील दुकाने, मार्केट बंद ठेवले होते. या प्रकरणाची चौकशी करुन आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निवदेन देण्यात आले.
शांततेच्या मार्गाने झालेल्या या बंद आंदोलनात सिंधी बांधवांना हाताला काळ्या फिती लावून याचा निषेध देखील केला. यावेळी आव्हाड यांच्या व्हिडीओ क्लिपची सतत्या तपासून पहावी, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी आव्हाड यांची ब्रेन मॅपिंग टेस्ट व नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.