अंबरनाथ : अनेक वर्षांपासून पडीक अवस्थेत असलेल्या नेताजी मैदानाला सुस्थितीत आणण्याचा प्रशासनाचा गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहे. हे मैदान खेळण्यासाठी योग्य झाले असून आता याच मैदानावर खेळाडूंसाठी इनडोअर स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव आहे. या कामासाठी ८ कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. या कामाच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.अंबरनाथ पश्चिम भागातील नेताजी मैदानावर इनडोअर स्टेडियम उभारण्यासाठी पालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. शहरातील होतकरू खेळाडूंसाठी हक्काची जागा तयार करण्याचे काम येथे केले जात आहे. पालिकेने तयार केलेल्या प्रस्तावात बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, कबड्डी, खो-खो, कराटे अशा विविध खेळांसाठी हे स्टेडीयम तयार करण्यात येणार आहे. सोबत प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रशस्त अशी गॅलरी उभारली जाणार आहे. या स्टेडियमच्या शेजारीच पालिकेने नुकतेच उद्घाटन केलेली शुटींग रेंज आहे. त्या पाठोपाठ आता बंदिस्त क्रीडासंकुलाचाही प्रस्ताव तयार केला आहे. या कामाचा ८ कोटींचा प्रस्ताव असून त्यासाठी नगरोत्थान योजनेतून निधीची मागणी पालिकेने केली आहे. त्यातील ३ कोटींचा पहिला टप्पा पालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. हा निधी येताच पालिकेने या कामाची निविदा काढली असुन ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लागलीच क्रिडा संकुलाचे काम सुरु करण्यात येणार आहे.या स्टेडीयमवर ४०० मिटरचा धावपट्टी तयार करण्यात येणार आहे. तसेच शेजारी बांधणार असलेल्या या बंदिस्त क्रीडा संकुलात जास्तीत जास्त क्रीडा प्रकार सामावुन घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुस्ती सारख्या खेळालाही जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कबड्डी आणि कुस्ती हा मातीतला खेळ असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ मॅटवर खेळला जातो. मात्र या भागातील कबड्डीपट्टूंना आणि कुस्ती खेळणाऱ्यांना मॅटवर सराव करता येत नाही. ती गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न या क्रीडा संकुलात केला जाणार आहे.निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते काम वर्षभरात कसे पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न सुरु आहे. सोबत मैदानाच्या परिसरातील गैरसोयी दुर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या मैदानातील महत्त्वाची अडचण म्हणजे परिसरातील अतिक्रमण. ही अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेने अजूनही ठोस कारवाई केलेली नाही. ते शक्य झाल्यास मैदानासाठी अतिरीक्त जागा मिळणार आहे.पडीक मैदानाला सुस्थितीत आणण्याचा आमचा सर्वात आधीपासुन प्रयत्न होता त्याला मुर्त स्वरुप आलेले आहे. आता या ठिकाणी बंधिस्त क्रिडा संकुल लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे स्वत: या कामावर लक्ष ठेवुन आहेत. निविदा प्रक्रिया अंतिम टप्पायत असुन त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. - मनिषा वाळेकर, नगराध्यक्ष. अंबरनाथ.
अंबरनाथमध्ये बंदिस्त क्रीडासंकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:49 AM