ठाणे : देशात स्मार्ट सिटी म्हणून उदयाला आलेल्या ठाणे शहराला ‘थुंकी मुक्त ठाणे’ करण्यासाठी येथील प्रसिद्ध बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाने माेहीम हाती घेऊन महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यास अनुसरून आज या महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी यांनी हाती फलक घेत ठाणे शहरात प्रभात फेरी काढून जनजागृती केली आहे.
शहराचे सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या प्रोत्साहनासाठी या महाविद्यालयाने ठाणे शहरातील विविध ठिकाणी थुंकण्याच्या सवयी विरोधी मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमाचा उद्देश सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे होणारे दुष्परिणाम, विशेषतः तंबाखूचे सेवन करणाऱ्यांमध्ये जनजागृती करून क्षयरोग (टी.बी.) सारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका टाळण्यासाठी ‘थुंकी मुक्त ठाणे’ माेहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात सहभागी हाेऊन जागाेजागी थुंकणाऱ्यांच्या सवयींना आळा घालण्याचे आवाहन या काॅलेजने आजच्या प्रभातफेरीव्दारे केले आहे.
या मोहिमेचे प्रमुख आकर्षण ठरले ते ‘स्पिटून’ हे छोटे, वाहून नेता येणारे पिशव्यांसारखे उपकरण वाहन चालक आणि तंबाखू चघळणाऱ्या प्रवाशांना रोटरी क्लब ऑफ होरायझनच्या राधिका पद्मनाभन यांच्या कडून वाटण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याऐवजी याचा वापर करावा, यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. शहरात स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण टिकवण्यासाठी हे एक छोटेसे पण महत्त्वपूर्ण पाऊल ठरते आहे.
ठाणे महानगरपालिकेने या प्रयत्नांची दखल घेतली व प्रशंसा केली आहे. सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि क्षयरोग प्रतिबंधाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचा सहभाग उल्लेखनीय ठरला आहे. या उपक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विंदा मांजरमकर , राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख कॅप्टन बिपिन धुमाळे व राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि नागरिकांना आरोग्यपूर्ण सवयी अंगीकारण्यासाठी प्रेरित केले.