ठाणे : ठाण्याच्या डायघर भागातून सैफुल जनुद्दीन शेख या बांगलादेशीला मुंबईच्या विशेष शाखेने अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याने बेकायदेशीररीत्या भारतात घुसखोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात भारतीय पारपत्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एक बांगलादेशी नागरिक शीळफाटा येथे बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या संरक्षण विभागातील आय शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे यांना मिळाली होती. त्याआधारे या शाखेचे पथक मंगळवारी डायघर पोलीस ठाण्यात आले. डायघर पोलिसांबरोबर संयुक्त कारवाईतून शीळफाटा येथील शंकर मंदिराजवळ संजय अलीमकर चाळीत राहणाऱ्या शेख याच्या घरावर या पथकाने छापा टाकला.याच छाप्यामध्ये त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो मूळचा बांगलादेशी असल्याची त्याने कबुली दिली. त्याच्याकडे भारतात वास्तव्य करण्याची कोणतीही अधिकृत परवानगी नव्हती. तरीही, त्याने घुसखोरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्याकडील मोबाइल जप्त केला असून त्याने वारंवार बांगलादेशात संपर्कसाधल्याचेही स्पष्ट झाल्याचे डायघर पोलिसांनी सांगितले.
डायघरमधून बांगलादेशीला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 4:50 AM