- प्रज्ञा म्हात्रेठाणे : भरगच्च पगाराचे आमिष दाखवून बांगलादेशहून पंचवीसवर्षीय तरुणीला भारतात तिच्या नातेवाइकांनी घरकामासाठी आणले. इथे आल्यावर तिला अनेक कटू अनुभवांचा सामना करावा लागला. सततच्या छळामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या या तरुणीला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घ्यावे लागले. आता ती बरी झाल्याने तिचे पुनर्वसन कस्तुरबा महिला वसतिगृहात करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी मनोरुग्णालयातून तिला तेथे पाठवण्यात आले. खरेतर, तिला बांगलादेशातील आपल्या मूळ घरी परत जायची इच्छा आहे. परंतु, बांगलादेशी दूतावासाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा प्रादेशिक मनोरुग्णालयाने केला आहे. आरोग्य उपसंचालिका डॉ.गौरी राठोड, मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय बोदाडे, उपअधीक्षक डॉ. रीटा परवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिचे पुनर्वसन वसतिगृहात करण्यात आले आहे.वयाच्या बाविसाव्या वर्षी या तरुणीला मीरा-भार्इंदर येथे तिच्या नातेवाइकांकडे भरगच्च पगार देण्याचे गाजर दाखवून घरकामासाठी आणण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. या नातेवाइकांकडून तिचा छळ सुरू झाला. मारहाण केली जाऊ लागली. मला मायदेशी परत जायचे आहे, असा तगादा तिने लावला. परंतु, तिला दमदाटी केली जात असे. या त्रासामुळे तिचे मानसिक संतुलन ढासळू लागले. एके दिवशी संधी साधत तिने घरातून पळ काढला. मानसिकदृष्ट्या खचलेली ही तरुणी वालीव पोलिसांना भ्रमिष्टावस्थेत सापडली. त्यांनी तिला प्रादेशिक मनोरुग्णालयात २०१६ साली दाखल केले. मनोरुग्णालयाला तिची भाषा समजायलाच पहिले सहा महिने गेले. त्यानंतर, ती बांगला बोलते, असे लक्षात आले. २०१७ साली अनुवादकाकडून तसेच आणखीन एका महिला रुग्णामार्फत या तरुणीशी संवाद साधला जाऊ लागला. समाजसेवा अधीक्षक सुरेखा वाठोरे यांनी तिच्याकडून हळूहळू माहिती मिळवली. सुरुवातीला तिने फोन क्रमांक दिला, पण त्या क्रमांकावर संपर्क झाला नाही. औषधोपचारांनी नंतर तिच्यात सुधारणा होत गेली आणि ती स्वत:चा पत्ता स्वत: लिहू लागली, असे वाठोरे यांनी सांगितले. तिने दिलेला घरचा पत्ता पोलीस आणि बांगलादेशाच्या दूतावासाला देण्यात आला आहे आणि तो पत्ता शोधण्याची कार्यवाही सुरू आहे, असे मनोरुग्णालयाने सांगितले. ही तरुणी बरी झाली असल्याने तिला मनोरुग्णालयाऐवजी वसतिगृहात ठेवल्यास तिचे मानसिक संतुलन चांगले राहील, या उद्देशाने तिला गुरुवारी चेंबूर येथील कस्तुरबा महिला वसतिगृहात पाठवण्यात आले. बांगलादेश येथील सामाजिक संस्थांनाही तिच्या कुटुंबाचा शोध घेण्याबाबत पोलिसांमार्फत मेलद्वारे कळवले आहे. ही तरुणी मानवतस्करीच्या रॅकेटमध्ये अडकल्याने भारतात आली असावी, अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली गेली.ही तरुणी सीमारेषा ओलांडून आली आहे. तिच्याकडे पासपोर्ट नाही. बांगलादेशी दूतावास तिची दखल घेत नसल्याने तिच्या घरवापसीत अडचणी येत आहेत. तिला चांगले वातावरण मिळावे म्हणून तिचे पुनर्वसन कस्तुरबा महिला वसतिगृहात करण्यात आले आहे.- डॉ. संजय बोदाडे, वैद्यकीय अधीक्षक
‘त्या’ बांगलादेशी तरुणीला घर गाठण्याची लागली ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 2:32 AM