ठाणे: एका बांग्लादेशीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून भारतात आणून तिला शरीरविक्रयाच्या व्यवसायात ढकलणा-या शेहग इस्लाम (२५) आणि लियान मुल्ला (२०) या मामा भाच्च्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यातील शेहग हा मामा तर लियान त्याचा भाच्चा आहे.एका अल्पवयीन मुलीला कळव्यामध्ये विक्रीसाठी आणले जाणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांना संबंधित विक्रेत्याने सांगितल्याप्रमाणे ७५ हजार रुपये देण्याची तयारीदौंडकर यांनी दर्शविली. त्याने ६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाजवळ येत असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे शेहग आणि लियान हे मामा भाच्चे तिथे आले आणि त्यांना दौंडकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. वाळके यांच्या पथकाने पकडले. त्यांच्या तावडीतून या १६ वर्षीय पिडीत मुलीची सुटकाही त्यांनी केली. चौकशीमध्ये लियान याने या मुलीला बांग्लादेशातून लग्नाच्या अमिषाने एक महिन्यापूर्वीच भारतात आणले. नंतर बंगळुरुमध्ये नेऊन लियानच्या आत्याने तिला शरीरविक्रयाच्या व्यवसायात ढकलले. महिनाभर तिच्यावर अनेकांनी लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर मुंबईत जायचे असल्याचे सांगून तिला वाशीला त्यांनी आणले. तिथूनच ते तिची विक्री करण्याच्या बेतात असतांनाच दौंडकर यांच्या पथकाने तिची सुटका करुन दोघांनाही अटक केली. त्यांच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात अपहरण करणे, बलात्कार, पोस्को तसेच परकीय नागरिकांच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.